मुंबई पुणे अंतर आता फक्त ४८ मिनिटांमध्ये
बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे प्रवास करणं सोप्प होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती
Mumbai Pune Bullet Train Project News मुंबई आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आता बुलेट ट्रेनमुळे भविष्यात दोन्ही प्रमुख शहरांतील प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत होणार आहे. या दोन्ही शहरांचा एकात्मिक आर्थिक क्षेत्र म्हणून विकास करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील जबिल कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादन विस्तार प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील जबिल कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादन विस्तार प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, आमदार दिलीप वळसे पाटील, ज्ञानेश्वर कटके, राज्याचे उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, जॅबिलचे कार्यकारी उपाध्यक्ष (ऑपरेशन्स) अँडी प्रिस्टली, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. एन. शुक्ला, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसेच एमआयडीसीच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी सांगितले की, महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीतील महत्त्वाचे केंद्र बनविण्यासाठी जेएनपीटी आणि उभारणीच्या अंतिम टप्प्यात असलेले वाढवण बंदर यांना समृद्धी महामार्गालगत स्वतंत्र मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरद्वारे जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव केंद्र सरकारसमोर ठेवण्यात आला आहे. हा कॉरिडॉर जालना, वर्धा येथील ड्राय पोर्ट आणि पुढे गडचिरोलीपर्यंत विस्तारला जाईल. त्यामुळे वाहतूक व लॉजिस्टिक्स खर्चात ७ ते ८ टक्क्यांची घट होऊन उद्योगांना मोठा फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र देशातील प्रमुख डेटा सेंटर हब म्हणून उदयास येत असून भारतातील सुमारे ६० टक्के डेटा सेंटर क्षमता राज्यात विकसित होत आहे. डेटा सेंटर, डीप टेक, इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर उत्पादनाशी संबंधित संपूर्ण उद्योग परिसंस्था राज्यात उभारण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
केंद्रीय रेल्वे व इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जबिलच्या अत्याधुनिक प्रकल्पाचे कौतुक करत भारताला जागतिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील भागीदार बनवण्याचा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन उद्योग १३ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून इलेक्ट्रॉनिक्स ही भारताची तिसरी सर्वात मोठी निर्यात श्रेणी बनल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विविध रेल्वे आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहिती देताना मुंबई–पुणे बुलेट ट्रेनमुळे प्रवासाचा कालावधी ४८ मिनिटांपर्यंत कमी होईल, तर पुणे–हैदराबाद प्रवास सुमारे २ तास ८ मिनिटांत पूर्ण होईल, असे सांगितले. जबिल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. एन. शुक्ला यांनी गेल्या एका वर्षात कंपनीचे भारतातील उत्पादन क्षेत्रफळ ५ लाख चौरस फुटांवरून १२ लाख चौरस फुटांपर्यंत वाढल्याची माहिती दिली. तसेच कर्मचाऱ्यांची संख्या ५ हजारांवरून जवळपास ११ हजारांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.