मुंबईला बुधवारी मुसळधार पावसाने (Mumbai Heavy Rainfall) झोडपून काढले. या पावसामुळे मुंबईच्या ठिकठिकाणी पाणी साचले होते. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. लोकलसेवा, रस्ते वाहतुकीवर या पावसामुळे मोठी परिणाम झाला. अशामध्येच मुंबईत उघड्या चेंबरमध्ये पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. चेंबरमध्ये पडून ही महिला नाल्यातून वाहत गेली. अंधेरीच्या सिप्स परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली
मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे अंधेरी पूर्वच्या सिप्स परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. याचदरम्यान उघड्या चेंबरमध्ये पडून महिला वाहून गेली. या घटनेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सिप्स कंपनीच्या समोर मेट्रो लाइन - 3 चे काम सुरू असलेल्या ठिकाणी ड्रेनेजचे झाकण खुले होते. पावसाचे पाणी साचल्यामुळे या महिलेला ते दिसले नाही. रस्ता क्रॉस करत असताना ही महिला थेट चेंबरमध्ये पडली आणि वाहून गेली.
मेट्रोकडून काम केल्यानंतर रस्त्याच्या मधल्या डिव्हायडरमध्ये असलेल्या चेंबरचे झाकण लावण्यात आले नव्हते. ही ड्रेनेज लाईन उघडी होती. संध्याकाळी दहाच्या सुमारास एक महिला सिप्स कंपनीमधून बाहेर येऊन रस्ता क्रॉस करत असताना या उघड्या चेंबरमध्ये पडली. नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे ही महिला नाल्यातून वाहत गेली. ही महिला नाल्यातून १०० ते १५० मीटर दूर अंतरापर्यंत वाहून गेली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक पोलिस आणि मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. तब्बल एक तास सर्च ऑपरेशन करून महिलेला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. मेट्रो 3 लाईनचे 5 तारखेला उद्घाटन होणार आहे. मात्र या उद्घाटनाआधी मेट्रोच्या चुकीमुळे महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.