मीरारोडच्या जेपी नॉर्थ कॉम्प्लेक्सजवळ बांधकाम साईटवरील टॉवर क्रेन कोसळली
क्रेन पार्किंग परिसरात पडल्याने अनेक वाहनांचे मोठे नुकसान
दुर्घटनेत 24 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी
दोषींवर कठोर कारवाईची मागणी
मुंबईतील मीरा रोड परिसरात गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली. मिरारोडच्या जेपी नॉर्थ कॉम्प्लेक्समध्ये एका बांधकाम साईटच्या ११ व्या मजल्यावरील क्रेन अचानक कोसळून खाली उभ्या वाहनांवर पडली. या अपघातात वाहनांचा चक्काचूर झाला. या क्रेनच्या ढिगाऱ्याखाली एक व्यक्ती अडकून गंभीर जखमी झाला, तर एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मीरारोडच्या विनय नगर येथील जेके आयरीस बिल्डिंगच्या बाजूला नव्या बिल्डिंगचे बांधकाम सुरू होते. या बिल्डिंगच्या १६ व्या मजल्यावरून बांधकाम साहित्य वर नेण्यासाठी वापरण्यात येणारी टॉवर क्रेन अचानक कोसळली. क्रेनचा मोठा भाग थेट बाजूच्या जेके आयरीस सोसायटीच्या पार्किंगमध्ये पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. क्रेन कोसळल्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक घटनस्थळी दाखल झाले आणि एकच गोंधळ उडाला.
या दुर्घटनेत सुरुवातीला अनेक नागरिक क्रेनखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र क्रेनच्या खाली २ व्यक्ती अडकल्याचे आढळले. त्यातील एक गंभीर जखमी झाला असून २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. जखमी व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अन्य काही जण किरकोळ जखमी झाल्याचीही प्राथमिक माहिती आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच मीरा रोड पोलीस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील स्थायी समिती सभापती हसमुख गहलोत यांनी भेट दिली असून गंभीर दुखापत झालेल्या रुग्णांची खाजगी रुग्णालयात जाऊन भेट दिली. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून ही घटना का घडली याचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांना निर्देश दिले आहेत. दोषीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील आम्ही केली आहे अशी प्रतिक्रिया आमदार नरेंद्र मेहता यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.