नीलेश खरे
Special Editorial Article on Mumbai Local : मुंबई, ही स्वप्ननगरी, पण हीच स्वप्ननगरी दररोज ८ कुटुंबांच्या स्वप्नांची राखरांगोळी करते आणि त्याला जबाबदार असते ती मुंबई लोकल. गेल्या १० वर्षांत मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना सरासरी ८-९ जणांचा मृत्यू होत असल्याचं रेल्वे पोलिसांच्याच रिपोर्ट्समधून स्पष्ट होतं. ... गेल्या १२ महिन्यांत २५९० जणांचा मृत्यू झाला आहे .
जगभरातल्या नागरी प्रवासी सेवा देणाऱ्या वाहतुकीवर नजर टाकली तर मुंबई लोकल ही सर्वात जास्त जीव घेणारी नागरी प्रवासी सेवा आहे हे यावरून सिद्ध होतं. मुंबईची ही दयनीय परिस्थिती काही कुणापासून लपून कधीच नव्हती, मात्र पराकोटीच्या सहनशक्तीने आणि 'आला दिवस घालवण्याच्या' मानसिकतेने 'चाकरमानी' समजल्या जाणाऱ्या मुंबईकरांनी किड्या-मुंग्यांसारखं जगणं स्वीकारलंय त्यातून व्यवस्थेच्या हातून त्यांच्या पदरात काहीच पडत नाही अशी परिस्थिती आहे. अपघातात आपण नव्हतो ना, हाच विचार करत मुंबईकर उसासा टाकतो आणि दिवस ढकलतो. साहजिक आहे, इथे माणसाचा जीव स्वस्त आणि जमीन महाग आहे. नोकरी हा कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा एकमेव मार्ग आहे. त्यासाठी घरातला कर्ता पुरुष किंवा महिला लोकलच्या दरवाज्यात जीव टांगणीला लावून प्रवास करताना दिसतात. हे सर्व अमानवी आहे हे लपवण्यासाठी मग व्यवस्था याला नाव देते 'मुंबई स्पिरिट'चं. काही क्षणासाठी का होईना मुंबईकरांच्या मनात तयार झालेल्या उद्वेगावर यातून पांघरूण घातलं जातं. दुसरा दिवस उजाडला की पुन्हा याच लोकलच्या घड्याळाच्या फिरत्या काट्यासारखा मुंबईकर दिवस घालवतो आणि कालचा अपघात विसरतो.
अपघातानंतर बातम्या प्रकाशित होतात आणि तात्पुरती मलमपट्टीही होते. मात्र करण्यासारखं बरंच काही आहे, जे प्रत्यक्षात आणणं शक्यही आहे. मुंबई उपनगरातून सुमारे ६५ लाख लोक दररोज नोकरी-धंद्याच्या निमित्तानं मुंबईत येण्यासाठी लोकलचा वापर करतात. यातील सुमारे ४५ लाख लोक हे नोकरीसाठी तर २० लाख हे इतर कारणांनी प्रवास करताना दिसतात. यातील सर्वात जास्त प्रवासी हे सकाळी ८ ते १० वाजेच्या सुमारास तर सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेच्या काळात मुंबई लोकलचा वापर करतात. अपघाताच्या वेळांवर नजर टाकली तर ८० टक्के अपघात हे याच काळात होतात. यातून एक गोष्ट स्पष्ट आहे, की जर कार्यालयांच्या वेळा बदलल्या तर हा प्रश्न काहीसा सुटू शकतो. ज्या सेवा १० ते ६ या वेळेत देणे गरजेचे नसेल, त्या सेवा कार्यालयातील कर्मचाऱ्यांना इतर शिफ्टमध्ये बोलावल्यास लोकल सेवेवरील ताण कमी करता येईल.
दुसरा पर्याय म्हणजे वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी अतिरिक्त लोकल सेवा उपलब्ध करणे. मात्र, दर दोन मिनिटांनी धावणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवायची असल्यास अतिरिक्त रेल्वे रुळांची गरज आहे. ही गरज समजून त्यामार्गाने पाऊलेही टाकली गेली, मात्र ती प्रत्यक्षात कधी आलीच नाहीत. उन्नत रेल्वे (Elevated Rail) हा प्रकल्प सुमारे १६ वर्षांपूर्वी केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात मांडण्यात आला होता. त्यावेळी देशाच्या रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी यासंदर्भातील घोषणा केली होती. पुढे मात्र ही योजना सरकारी फायलीतच दफन झाली. या योजनेला पुनर्जीवित केल्यास काही प्रमाणावर लोकल सेवेचा दर्जा सुधारणं आणि अपघात टाळणं शक्य होणार आहे.
निधी आणि विकासाकडे दुर्लक्ष
या प्रकल्पाची मांडणी करताना यावर होणारा खर्च हा अमाप असल्याची ओरड केली जाते, मात्र या निमित्तानं एक प्रश्नही उपस्थित होतो: बुलेट ट्रेनसाठी अब्जो रुपयांचा निधी उपलब्ध होत असेल, तर देशातील सर्वात जास्त कर भरणाऱ्या मुंबईसाठी निधी का उभा राहू शकत नाही? यासाठी राजकीय नेतृत्वाची इच्छाशक्ती कमी पडते हे स्पष्टच आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, मात्र इथल्या नागरी सेवांचा विचार करता ही आर्थिक राजधानी आजही इंग्रजांनी उभ्या केलेल्या नागरी प्रवासी सेवेवर चालतेय असंच म्हणावं लागेल. एकंदरीत मुंबई ही सोन्याचं अंडं देणारी कोंबडी म्हणूनच तिचा वापर केला गेलाय.मुंबईतील रेल्वेस्थानकं ही नगर आणि उपनगरांची प्रमुख बाजारपेठ बनली आहेत. या भागात असलेले जमिनीचे भाव हे गगनाला भिडणारे आणि मोठी मागणी असलेले आहेत. या रेल्वेस्थानकांची पुनर्बांधणी केल्यास त्यातून अब्जो रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळू शकते व मुंबईतील लोकल सेवा सुधारता येऊ शकतात. मात्र हे शिवधनुष्य पेलण्याची कोणत्याही राजकीय व्यवस्थेची इच्छाशक्ती गेल्या दोन दशकांत पाहिला मिळालेली नाही.
एकंदरीत, मुंबई ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. काल झाला त्यापेक्षा कितीतरी जास्त जीवघेणा अपघात होण्याची भीती उजाडणाऱ्या प्रत्येक दिवसागणीक वाढत आहे. तरीही या शहरातील गर्दी कमी होत नाही आणि जगण्यातल्या गर्दीत मरण स्वस्त होतं जातंय याला मुंबईकर आणि त्याची अपार सहनशक्तीच जबाबदार आहे .
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.