Mumbai Local Mumbra Station Accident : मुंब्रा रेल्वे स्थानकात लोकलच्या अपघातात आणखी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. काल सकाळी दोन लोकल एकमेकांना घासल्यामुळे मोठी दुर्घटना घडली होती. त्यामुळे ४ जणांचा मृत्यू झाला होता. त्याच मुंब्रा स्थानकात लोकलचा आणखी एक अपघात झाला आहे. सोमवारी संध्याकाळी मुंब्रा स्टेशनवर झालेल्या लोकल अपघाताने खळबळ उडाली आहे. मुंब्रा ते ठाणे दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनने एका ३० वर्षीय महिलेला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मृत महिला, मीना प्रदीप बोडपडे (वय ३०), रेतीबंदर मार्गावरील रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना हा अपघात घडला. मुंब्रा आणि कळवा रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या या मार्गावर ट्रॅक ओलांडणे धोकादायक असल्याचे यापूर्वीही अनेकदा सिद्ध झाले आहे. प्रत्यक्षदर्शींनुसार, मीना ट्रॅक ओलांडत असताना वेगाने येणाऱ्या लोकल ट्रेनने तिला जोरदार धडक दिली. या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या आणि काही क्षणांतच त्यांचा मृत्यू झाला. स्थानिकांनी तातडीने रेल्वे पोलिसांना माहिती दिली, मात्र तोपर्यंत त्यांचे प्राण गेले होते.
रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला. प्राथमिक तपासात मीना या स्थानिक रहिवासी असल्याचे समोर आले आहे. त्या नियमितपणे रेतीबंदर मार्गावरून ये-जा करत होत्या. मात्र, रेल्वे ट्रॅक ओलांडताना आवश्यक खबरदारी न घेतल्याने हा दुर्दैवी अपघात घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मुंब्रा परिसरात रेल्वे ट्रॅक ओलांडण्याच्या घटना वारंवार घडत असून, यापूर्वीही अशा अपघातांमध्ये अनेकांचा बळी गेला आहे. स्थानिक रहिवाशांनी रेतीबंदर मार्गावर पादचारी पूल किंवा सुरक्षित मार्गाची मागणी केली आहे. रेल्वे प्रशासनाने यापूर्वी अशा घटनांनंतर सुरक्षा उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु प्रत्यक्षात फारसे बदल झालेले नाहीत, अशी टीका स्थानिक करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.