संजय गडदे, साम टीव्ही
मुंबईतील नागरिकांनी वैद्यकीय उपचार घेताना डॉक्टरांची वैद्यकीय पदवी, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी आणि आवश्यक परवाने तपासूनच उपचार घ्यावेत, असा सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईच्या गोवंडी परिसरात आवश्यक वैद्यकीय नोंदणी व परवाना नसतानाही रुग्णांवर उपचार करणारे चार झोलाछाप डॉक्टर आढळून आले असून, त्यांच्याविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.
मुंबईच्या गोवंडी परिसरातील डॉ. झाकीर हुसेन नगर, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड परिसरात बोगस डॉक्टरांविरोधात गुन्हे प्रकटीकरण कक्ष-६ने मोठी कारवाई केली. चार वेगवेगळ्या क्लिनिकमध्ये रुग्णांवर बेकायदेशीरपणे उपचार करणाऱ्या चार इसमांविरोधात देवनार पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कक्ष-६ला संबंधित क्लिनिकमध्ये आवश्यक परवाना किंवा वैद्यकीय नोंदणी नसतानाही रुग्णांची तपासणी करून उपचार केले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिस पथकाने महानगरपालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकारी आणि पंचांसह संबंधित ठिकाणी जाऊन तपासणी केली.
या कारवाईदरम्यान सगीर क्लिनिक, गायत्री क्लिनिक, आयेशा क्लिनिक आणि पटेल क्लिनिक येथे चार इसम रुग्णांवर उपचार करताना आढळून आले. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी नसल्याचे आढळून आल्याचा पोलिसांचा दावा आहे. या कारवाईत सगीर अहमद आणि अखिलेश कुमार दुबे यांच्याकडून ४९ हजार ६७० रुपयांची ॲलोपॅथिक औषधे व इतर साहित्य, तर केशव प्रसाद पटेल आणि मेहमूद आलम मोहम्मद शरीफ शेख यांच्याकडून ६९ हजार ६५४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही कारवायांमध्ये एकूण १ लाख १९ हजार ३२४ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवनार पोलीस ठाण्यात वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ मधील कलम ३३ आणि ३६ अंतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदिप रहाणे, पोलीस उपनिरीक्षक शरद नाणेकर, हेड कॉन्स्टेबल डगळे, हेड कॉन्स्टेबल खेडकर तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. काळे, महिला पोलीस उपनिरीक्षक चौधरी, हेड कॉन्स्टेबल वानखेडे आणि हेड कॉन्स्टेबल बैलकर यांच्या पथकाने सहभाग घेतला.
नागरिकांनी केवळ क्लिनिकचा फलक किंवा डॉक्टर म्हणून केलेला दावा पाहून उपचार घेऊ नयेत. संबंधित डॉक्टरची वैद्यकीय नोंदणी व पात्रता तपासूनच उपचार घ्यावेत. संशयास्पद व्यक्तींकडून वैद्यकीय उपचार दिले जात असल्यास संबंधित प्रशासन किंवा पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.