
संजय गडदे, साम टीव्ही
मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद पडलेल्या धडकन बारमध्ये तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. तरुणाची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला. हत्येच्या घटनेनंतर मुंबईतील वनराई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात रघू गौडा गंभीर जखमी झाले. त्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान रघू गौडा यांचा मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी पोलिसांनी फरार आरोपी देवराज गौडा याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मालाड परिसरात असलेल्या थ्रोन हॉटेल अँड रेस्टॉरंटमध्ये पहाटेच्या 4 वाजण्याच्या सुमारास आरोपी देवराज गौडा आणि ग्राहक यांच्यात किरकोळ कारणावरून मारामारी झाली. यावेळी त्या ठिकाणी मॅनेजर म्हणून काम पाहणारे रघु गौडा उपस्थित नव्हते. रघु गौडा तीन वाजण्याच्या सुमारास गोरेगाव पूर्वेकडील मागील वर्षभरापासून बंद असलेल्या धडकन बारमध्ये असणाऱ्या खोलीत विश्रांतीसाठी पोहोचले.
मात्र ग्राहकांसोबत झालेला वाद मॅनेजर रघू याच्यामुळे झाल्याचा गैरसमज झाला. देवराजने रघू आराम करत असलेल्या खोलीत येऊन त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात रघू यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. यात रघू गौडा गंभीर जखमी झाले. त्या ठिकाणी असणाऱ्या रघू यांच्या दुसऱ्या सहकार्याने रघू जखमी झाल्याची बातमी वनराई पोलिसांना दिली. पोलिसांनी याप्रकरणी देवराज विरोधात कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी रघू गौडा याला जखमी अवस्थेत जवळच असलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रुग्णालयातील आयसीयू बंद असल्यामुळे रघू यांना पुढील उपचारासाठी अंधेरी पश्चिमेकडील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
उपचार सुरू असतानाच मंगळवारी रात्री रघूचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी आरोपी देवराज विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यात कलम बदल करून नव्याने 302 चा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी देवराज गौडा याला शोधण्यासाठी आता वनराई पोलिसांनी तीन तपास पथके तयार केली आहेत. आता आरोपीचा मुंबई,कर्नाटक भागात शोध घेण्याचे काम वनराई पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.