सावधान! तुमचा कॉल डिटेल रेकॉर्ड विकला जातोय; पोलिसांचाच हात असल्याच्या दाव्याने खळबळ

तुमच्या फोनवरील कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) सुरक्षित आहेत का? तुमचे कोणाशी बोलणे झाले, किती वेळ बोलणे झाले, यांसारखी गोपनीय माहिती पैशांसाठी विकली जात असल्याचा गंभीर मुद्दा समोर येत आहे.
Police
Policesaam tv
Published On: 

साक्षी यादव, मुंबई प्रतिनिधी

मुंबई क्राईम ब्रँचच्या युनिट १२ ने पर्दाफाश केलेल्या जासूसी रॅकेटच्या तपासात एकापाठोपाठ एक अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या रॅकेटमध्ये कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), सबस्क्रायबर डिटेल रेकॉर्ड (SDR) आणि मोबाईलचे लाईव्ह लोकेशन बेकायदेशीरपणे मिळवून दिले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेले बिहार आणि झारखंड पोलिसांतील कर्मचारी प्रिन्स कुमार साहनी आणि पंकज कुमार शुक्ला हे एका CDR किंवा SDR साठी प्रत्येकी ४,००० रुपये घेत असल्याचा आरोप आहे. आतापर्यंत ५० हून अधिक व्यक्तींची गोपनीय माहिती काढून ती या रॅकेटचा कथित मुख्य सूत्रधार संजय ऊर्फ हंजला मुबारक सैयद याच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याचा संशय आहे. त्यानंतर ही माहिती महागड्या दराने विकून लाखो रुपयांची कमाई केली जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.

नातेवाईकांच्या माध्यमातून पोलिसांपर्यंत पोहोच

या प्रकरणातील तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही पोलीस कर्मचारी, बिहार आणि झारखंडमधून आधीच पकडलेले अमित कुमार तिवारी, आझाद कुमार पासवान, कृष्णकुमार गौतम आणि संजीव कुमार गुप्ता यांचे जवळचे नातेवाईक असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे चारही आरोपी मोबाईल व्यवसायाशी संबंधित आहेत. त्यांच्याच सांगण्यावरून या पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून गोपनीय माहिती मिळवून दिल्याचा गंभीर आरोप आहे.

आरोपी इन्स्टाग्राम आणि टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मुख्य सूत्रधाराच्या संपर्कात आल्याचेही तपासात समोर आले आहे.

Police
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना ₹२१०० सुरू होणार, नेमकं सत्य काय? सरकारनं दिलं स्पष्टीकरण

जासूसीच्या कामासाठी ५० हजार ते १ लाखांपर्यंत उकळायचे पैसे!

मात्र, या रॅकेटचे काम केवळ CDR आणि लोकेशन काढण्यापुरते मर्यादित नव्हते. एखाद्या व्यक्तीवर पाळत ठेवण्यापासून ते तिच्या खाजगी आयुष्याची माहिती मिळवण्यापर्यंतच्या विविध कामांसाठी हे रॅकेट मोजमाप करून पैसे घेत असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.

एखाद्या व्यक्तीचे लाईव्ह लोकेशन मिळवणे, हरवलेला मोबाईल शोधणे, विवाहबाह्य संबंधांची माहिती काढणे, प्रेमप्रकरणातून घर सोडून गेलेल्या तरुण-तरुणींना ट्रॅक करणे, तसेच कॉर्पोरेट जासूसीसारखी कामे या रॅकेटकडून केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. कामाच्या स्वरूपावर आणि त्याच्या धोक्यावर त्याचे दर ठरत असत. या प्रकारच्या कामांसाठी तब्बल ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम उकळली जात असल्याचे तपासाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Police
Pune Police: वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या, पुणे पोलिस दलात खळबळ

२०३३/२०२३ पासून सुरू होता गोरखधंदा?

मिळालेल्या माहितीनुसार, हा अवैध गोरखधंदा २०२३ पासून सक्रिय असल्याचा संशय आहे. मात्र, आतापर्यंत नेमक्या किती लोकांची माहिती काढण्यात आली आणि किती जणांवर बेकायदेशीरपणे पाळत ठेवण्यात आली, याचा कसून तपास अद्याप सुरू आहे.

अटक होण्याच्या भीतीमुळे आरोपींनी आपल्या मोबाईलमधील अनेक चॅट्स आणि डिजिटल माहिती डिलीट केल्याचे समोर आले आहे. आता मुंबई क्राईम ब्रँच हा डिलीट केलेला सर्व डिजिटल डेटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. हा डेटा हाती लागल्यानंतर या रॅकेटचे आणखी काळे धागेदोरे उजेडात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एखाद्याचे खाजगी आयुष्य, मोबाईलवरील संभाषण आणि लोकेशन... हे सर्वकाही पैशांच्या जोरावर विकत घेतले जात असल्याचा अत्यंत गंभीर प्रकार या प्रकरणातून समोर आला आहे. आता या रॅकेटचे नेमके किती लाभार्थी आहेत, किती जणांची गोपनीय माहिती विकली गेली आणि या संपूर्ण नेटवर्कमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा सखोल शोध मुंबई क्राईम ब्रँच घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com