भाजपचे घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह भिकाऱ्याच्या वेशात
मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसले
जैन धर्मगुरू नम्रमुनी यांच्या सूचनेनुसार शाह यांनी एक दिवस भिकारी म्हणून जगण्याचा अनुभव घेतला
घाटकोपर परिसरात त्यांनी काही तास रस्त्यावर राहून भीक मागून अन्न घेतले
तुम्हाला मराठी अभिनेता स्वप्नील जोशीचा 'भिकारी' चित्रपट माहिती आहे? या चित्रपटात तो एक बिझनेसमॅन म्हणून दाखवला आहे. मात्र नंतर काही कारणास्तव भिकारीचं रूप घेऊन तो रस्त्यावर भटकताना पाहायला मिळतो. ही चित्रपटातील स्टोरी काहीशी खऱ्या आयुष्यात देखील पाहायला मिळत आहे. भाजपचे घाटकोपर पूर्व मतदारसंघाचे आमदार पराग शाह यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कोट्यवधींची संपत्ती असलेले पराग शाह हे चक्क भिकाऱ्याच्या वेशात मुंबईतील रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. सुरुवातीला हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, त्यामागील कारण समोर आल्यानंतर चर्चा सुरू झाली आहे.
जैन धर्मीयांचा सध्या चातुर्मास सुरू असून, जैन धर्मगुरू नम्रमुनी यांच्या सांगण्यावरून पराग शाह यांनी एक दिवस भिकारी म्हणून जगण्याचा अनुभव घेतल्याचे समोर आले आहे. आपल्या गुरूंच्या सूचनेचे पालन करताना शाह यांनी सुरक्षाव्यवस्था, गाड्या आणि महागड्या वस्तूंपासून स्वतःला दूर ठेवले. त्यानंतर त्यांनी भिकाऱ्याचा वेश धारण करून काही तास घाटकोपर परिसरातील रस्त्यांवर घालवले. या काळात त्यांनी रस्त्यावर बसून राहण्याबरोबरच भीक मागून अन्न घेतले. विशेष म्हणजे, या संपूर्ण काळात त्यांना रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक नागरिकांनी ओळखले नाही. त्यांचा मेकअप आणि वेशभूषा इतकी वेगळी होती की, नेहमी सुरक्षारक्षक आणि वाहनांच्या ताफ्यासह दिसणारे आमदार पराग शाह आहेत, याचा अंदाज कोणालाही आला नाही.
या अनुभवामागील उद्देश सामान्य नागरिक आणि विशेषतः गरजू लोकांचे आयुष्य जवळून समजून घेणे हा असल्याचे सांगितले जात आहे. ज्या-ज्या ठिकाणी शाह गेले, त्या ठिकाणी नंतर मेकअप काढून ते पुन्हा गेले आणि संबंधित लोकांशी संवाद साधला. या संपूर्ण अनुभवाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार पराग शाह यांनी ३,३८३ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जाहीर केली होती. त्यामुळे ते महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले होते. रिअल इस्टेट क्षेत्रात सक्रिय असलेले शाह यापूर्वी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवकही राहिले आहेत. त्यांच्या या अनोख्या प्रयोगामुळे आता राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.