राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी IMD ने रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी
पुणे-नाशिक घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता असल्याने रेड अलर्ट
यवतमाळमध्ये मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी
राज्यातील अनेक भागांमध्ये आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केले आहेत. विशेषतः उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि घाटमाथ्यावरील भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच विदर्भात पुढील काही तास महत्त्वाचे असल्याचे IMD ने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो. याशिवाय पालघर, ठाणे, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार सरींसह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील इतर भागांतही विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.काल पावसाने विदर्भातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले. सुरक्षिततेच्या कारणास्तव शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. आज देखील मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विकास मीना यांनी शुक्रवार, ३१ जुलै रोजी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यासाठी अतिवृष्टीसह मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केल्याने हा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता असून संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. हा आदेश शासकीय, अनुदानित आणि खासगी शैक्षणिक संस्थांना लागू आहे. प्रशासनाने नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.