अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी
Bhimrao Tapkir vs sachin dodake Khadakwasla Vidhan Sabha Exit Poll 2024: पुण्यातील खडकवासला मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे अशी तिरंगी लढत होत आहे. यामध्ये कोण विजयी होणार? याकडे पुणेकरांचे लक्ष लागलेय. एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार, खडकवासला मतदारसंघात भाजपचे पारडे जड असल्याचे दिसतेय. एक्झिट पोलचे आकडे भाजप, महायुतीसाठी सकारात्मक असल्याचं समोर आलेय.
पुण्यातील खडकवासला मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर चौथ्यांदा विजयी होतील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तापकीर यांच्या समोर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन दोडके आणि मनसेचे मयुरेश वांजळे यांचे आव्हान आहे. साम टीव्हीच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, खडकवासला मतदारसंघात भाजपच्या भीमराव तापकीर यांचा विजय होईल, असे सांगण्यात येत आहे.
खडकवासला मतदारसंघातून महायुतीकडून भाजपचे उमेदवार भीमराव तापकीर चौथ्यांदा विजयी होण्याची शक्यता आहे. तापकीर यांच्यासमोर महाविकास आघाडी कडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सचिन दोडके तर मनसे कडून दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे सुपुत्र मयुरेश वांजळे यांचे आव्हान असणार आहे. गेल्या तीन टर्म पासून आमदार राहिलेले भीमराव तापकीर पुन्हा एकदा निवडून येतील अशी शक्यता आहे. चौथ्यांदा जर भीमराव तापकीर निवडून आले आणि युतीचे सरकार आलं तर त्यांना मंत्रिपद मिळण्याची देखील दाट शक्यता आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा काही भाग शहरात तर काही ग्रामीण भागात येतो. या मतदारसंघातून जाणारा मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आणि त्या लगतचा असलेला सेवा रस्ता हा कळीचा मुद्दा ठरलेला आहे. त्याशिवाय मतदारसंघातील अनेक रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी तसेच पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेले गावांच्या टॅक्स संदर्भातले प्रश्न हे या विधानसभा मतदारसंघातील काही प्रमुख गोष्टी.
दुसऱ्या बाजूला याच मतदारसंघातून मनसेने दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे सुपुत्र मयुरेश वांजळे यांना उमेदवारी देऊन अनेकांच्या भुवया उंच केल्या. एक तरुण आणि तडफदार युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे सध्या पाहिले जाते आहे. वांजळे कुटुंबीयांचा राजकीय वारसा तसेच राजकीय दृष्ट्या परिपक्व असलेले मयुरेश वांजळे यांना किती मतं मिळतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल.
भीमराव तापकीर यांच्या विरोधात असलेले सचिन दोडके हे 2019 मध्ये सुद्धा त्यांचे प्रतिस्पर्धी होते. यंदा बदललेले राजकीय समीकरण तसंच शरद पवारांची जादू सचिन दोडकेना साथ देऊ शकते खरी मात्र साधा माणूस ओळख असलेले भीमराव तापकीर यांच्या पाठीशी भाजपचा एक मोठं केडर उभं आहे.
भीमराव तापकीर हे 2002 तसेच 2007 मध्ये भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून आले. रमेश वांजळे यांच्या निधनानंतर या ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत भीमराव तापकीर आमदार झाले आणि त्यानंतर आतापर्यंत त्यांच्या विजयात अडथळा आलेला नाही. भाजपाचे पक्ष संघटन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाठबळ तसेच युतीतील इतर दोन पक्षांचा पाठिंबा यावर पुन्हा एकदा भीमराव तापकीर आमदार होतील अशी शक्यता आहे. इतकच नाही तर महायुतीचे सरकार स्थापन झालं तर त्यांना मंत्रीपद देखील मिळेल अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.