

कल्याणमध्ये पंकजा मुंडे यांची प्रचारसभा
कल्याणमध्ये भाजपचाच विजय होणार असल्याचा मुंडेंचा दावा
कल्याण डोंबिवलीत २१ उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याचाही केला दावा
संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कल्याणमध्ये प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी महायुतीबाबत आत्मविश्वास व्यक्त करत सर्व ठिकाणी भाजपचाच विजय होणार असा ठाम विश्वास व्यक्त केला.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रचार सभा घेतल्या असून शेवटची सभा कल्याण–डोंबिवलीत होत आहे. सर्वत्र भाजपला चांगला प्रतिसाद मिळत आहे.जिथे-जिथे युती झाली आहे, तिथे उमेदवारांमध्ये मोठा उत्साह असून कल्याण डोंबिवलीत २१ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यामुळे सत्ता स्थापन करण्याबाबत आमच्यात प्रचंड आत्मविश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
कल्याण डोंबिवलीतील अलीकडील मारहाण व हाणामारीच्या घटनांवर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, जे घडलं ते होणं योग्य नव्हतं. आपण लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक लढवत आहोत. निवडणुकीत हातापायी, हाणामारी किंवा कोणी गंभीर जखमी होत असेल तर त्याचा मी तीव्र निषेध करते.
ठाकरे बंधूंच्या प्रचार सभांबाबत विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या, “त्यांची सभा पाहायला मला वेळ मिळाला नाही, कारण मी माझ्या प्रचारात व्यस्त होते. त्या पुढे म्हणाल्या, नगरपरिषद निवडणुकीत आम्ही नंबर वन पक्ष ठरलो होतो. आता महापालिका निवडणुकीतही नंबर वन होण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने काम करत आहोत. आमची विकासकामे थेट लोकांपर्यंत पोहोचत आहेत, त्यामुळे भाजप एक मजबूत आव्हान म्हणून उभी आहे.
भाजपच्या राष्ट्रीय ताकदीवर भर देताना त्या म्हणाल्या, भाजपने तिसऱ्यांदा अनेक राज्यांमध्ये सरकार स्थापन केले आहे.महाराष्ट्रातही आमचे सरकार आहे आणि अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमची ताकद आहे. हीच आमची खरी शक्ती आहे.
राज ठाकरे यांच्याबाबत प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मी थेट लोकांमध्ये जाते आणि सरकारचे काम मांडते. लोक आमच्यावर विश्वास ठेवतात. लोकशाहीत जनतेचा कौल सर्वात महत्त्वाचा असतो आणि तो नेहमीच आमच्या बाजूने लागतो.शेवटी त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की, लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी आमचाच विजय होईल, हा मला पूर्ण विश्वास आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.