

मुंबईकरांसाठी मोठी गुड न्यूज आहे. शहरातील पूर्व-पश्चिम प्रवास आणखी सोपा होण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल पडलंय. डायमंड गार्डन ते चेंबूर नाका या मेट्रो मार्गिका 2B च्या विस्तारित भागाचं, तसंच SCLR च्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेकडे जाणाऱ्या विस्तारित मार्गाचं काम पूर्ण होऊन हे मार्ग आता प्रवाशांसाठी खुले करण्यात आलेत. यासोबतच ठाणे-बोरिवली दरम्यानच्या दुसऱ्या बोगद्याचं काम सुरू करण्यासाठी अर्जुन टनेल बोरिंग मशीन (TBM) लाँच करण्यात आलंय.
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, या प्रकल्पांचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (MMRDA) अध्यक्ष एकनाथ शिंदे तसंच वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालं. डायमंड गार्डन ते चेंबूर नाका हा मेट्रो 2B चा विस्तारित भाग आता प्रवाशांसाठी खुला झालाय. याचबरोबर SCLR चा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेपर्यंतचा विस्तार देखील सुरू झाला आहे.
दरम्यान, ठाणे-बोरिवली जुळ्या बोगद्यांच्या प्रकल्पातील दुसरा बोगदा तयार करण्यासाठी ‘अर्जुन’ TBM मशीनचं काम सुरू करण्यात आलंय. MMRDAच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकल्पांमुळे मुंबईतील पूर्व-पश्चिम प्रवासाची कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार असून शहरातील काही अतिवर्दळीच्या मार्गांवरील प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होईल.
मेट्रो 2B च्या या विस्तारामुळे चेंबूर परिसरातील उपनगरीय रेल्वे आणि मोनोरेल नेटवर्कशी मेट्रोची कनेक्टिव्हिटी अधिक चांगली होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे, मोनोरेल आणि मेट्रो या तीनही सार्वजनिक वाहतूक पर्यायांमध्ये सहज प्रवास करता येणार आहे.
SCLRचा 1.40 किमी लांबीचा अंतिम उन्नत मार्ग भारत नगर रोड-मुंबई विद्यापीठ परिसराला वाकोला जंक्शनशी जोडतो. या मार्गामुळे वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) आणि मुंबई विमानतळाकडे जाणारी कनेक्टिव्हिटीही सुधारण्याची अपेक्षा आहे. यामुळे आता 10.30 किमी लांबीचं संपूर्ण एकत्रित SCLR नेटवर्क सुरु झालं आहे. परिणामी कालिना, वाकोला आणि कलानगर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असं म्हटलंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, याच वर्षी मुंबई महानगर प्रदेशात आणखी 60 ते 70 किमी लांबीचे मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे.
हे नवीन मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई आणि आसपासच्या भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी मजबूत होणार आहे. त्याचा थेट फायदा रोज कामासाठी, शिक्षणासाठी किंवा इतर कारणांसाठी प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना होणार असून दैनंदिन प्रवास अधिक सोपा आणि वेळ वाचवणारा होण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.