संजय गडदे, साम टीव्ही
मुंबई: गोरेगावातील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाचे सादरीकरण सुरू असताना काही जणांच्या गटाकडून म्हाडा उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांना विरोध करण्यात आला. यानंतर प्रकरण चांगलेच चिघळले. मात्र आता मोतीलाल नगरचा पुनर्विकास व्हावा यासाठी मोतीलाल नगर मधील तीन सोसायटी एकत्र आल्या असून आम्हाला पुनर्विकास हवा आहे. मात्र या ठिकाणी सत्ताधारी भाजप पक्षातील काही पदाधिकारी कार्यकर्ते आणि इथे असणारे गुंतवणूकदार यांचा प्रकल्पाला विरोध असल्याचे आज गोरेगाव येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रहिवाशांनी स्पष्ट केले. यावेळी आम्ही 1987 पासून पुनर्वसनासाठी म्हाडासोबत पुनर्विकासासाठी संघर्ष करत असल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे.
रहिवासी संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती माधवी राणे यांनी सांगितले की, प्रकल्पासाठी ९८ टक्के रहिवाशांनी प्रेझेंटेशनला सहमती दर्शवली आहे. सुरुवातीला २००० स्क्वेअर फुट घरांची मागणी करण्यात आली होती, म्हाडाने 1600 बिल्टअप देण्याचे जाहीर केले. मात्र रहिवाशांच्या मागणीचा विचार करून शासनाने 1600 कार्पेट एरियावर तडजोड केली. मात्र दोन लाख कॉर्पस फंड आम्हाला मान्य नसून कॉर्पस फंड आणि पार्किंग सुविधा वाढवण्याची मागणी कायम असून यासाठी लवकरच आम्ही म्हाडा उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांची भेट घेणार असल्याचे माधवी राणे यांनी सांगितले.
“आमची घरे तोडू नका, आधी पर्यायी घरे बांधा आणि मगच आम्हाला स्थलांतर द्या,” अशी भूमिका रहिवाशांनी मांडली आहे. तसेच मैदानावर इमारती उभारून तयार घरे देण्याचा पर्यायही म्हाडाला रहिवाशांनी सुचवला असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काही मोजक्या लोकांकडून प्रकल्पाला विरोध होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संतोष परब यांनी दावा केला की, हे विरोधक बाहेरचे गुंतवणूकदार असून त्यांना सध्या कमी भाड्यात मिळालेल्या जागांमुळे पुनर्विकास नको आहे. इथे अनेक गुंतवणूकदार आहेत ज्यांचे 10-12 गाळे आहेत. म्हाडाला त्याऐवजी अवघे 200 ते 800 रुपये द्यावे लागत आहे. मात्र इथे या गाळ्याच्या माध्यमातून लाखो रुपये महिन्याला भाडे कमावत आहे. यामुळे अशा गुंतवणूकदारांकडून पुनर्वसनाचा विरोध असल्याचे परब यांनी म्हटले आहे.
राजकीय पातळीवरही आरोप-प्रत्यारोप सुरू असून, स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांवर गोंधळ घालण्याचा आरोप करण्यात आला आहे. “सरकार तुमचंच असताना इथे आंदोलन करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांकडे जाऊन मागण्या मांडा,” असा टोला रहिवाशांनी लगावला. सध्या या प्रकरणावर पुढील चर्चा आणि निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.