

Summary -
मुंबईत लवकरच स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन एसी लोकल धावणार
या लोकल ICF चेन्नईमध्ये विकसित केल्या जात आहेत
मुंबईत स्वयंचलित दरवाजे असलेल्या २ नॉन एसी लोकल धावतील
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ऑटो-डोअर सिस्टम, वेस्टिब्युल्स आणि व्हेंटिलेशन युनिट बसवले जाणार आहेत
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. कारण मुंबईत लवकरच स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन एसी लोकल धावणार आहेत. भारतीय रेल्वेने यासाठी मोठं पाऊल उचलले आहे. गर्दीमुळे मुंबई लोकलमधून पडून आणि अपघात होऊन अनेक प्रवाशांचा नाहक बळी जातो. याच सर्वबाबी लक्षात घेऊन केंद्र सरकारने स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन एसी लोकल विकसित करण्याचे आदेश दिले आहेत. स्वयंचलित दरवाजे असलेल्या २ नॉन एसी लोकल तयार केल्या जात आहे. चेन्नईतील आयसीएफ कंपनीमध्ये या लोकल तयार केल्या जात आहेत.
मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा येथे लोकल अपघात झाला होता. लोकलमधून पडून ५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या मुंब्रा दुर्घटनेनंतर बंद दरवाजाच्या लोकल सुरू करण्यात याव्यात यासाठी चाचपणी सुरू झाली होती. असे केल्यास मुंबई उपनगरीय रेल नेटवर्कमध्ये सुधारणा येईल. सध्या मुंबईमध्ये ३००० लोकल धावतात. त्यामध्ये एसी लोकलचा देखील समावेश आहे. आता याच नेटवर्कवर २ स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन एसी लोकल विकसित केल्या जात आहेत. या लोकल सुरू झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित होईल.
लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन एसी लोकल विकसित करण्याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 'राष्ट्रीय वाहतुकीसाठी ऑटोमॅटिक डोअर-क्लोजर सिस्टमने असलेल्या २ नॉन-एसी लोकल ट्रेनसेट विकसित करणार आहे. या लोकल चेन्नईतील इंटेग्रल कोच फॅक्टरी म्हणजे आयसीएफ येथे तयार केल्या जाणार आहेत. आयसीएफसोबत मिळून आम्ही स्वयंचलित दरवाजे बंद करण्याच्या यंत्रणेसह २ नॉन-एसी रेक विकसित करण्याचा हा निर्णय घेतला आहे.'
अश्विनी वैष्णव यांनी पुढे सांगितले की, 'या नवीन ईएमयू रॅकमध्ये स्वयंचलित दरवाजे, २ डब्यांमधील जोडणीसाठी वेस्टिब्युल्स, छतावरील व्हेंटिलेशन युनिट आणि दरवाज्यांवर हवेच्या वहनासाठी खिडकीचे झडप बसवले जाणार आहेत.' या लोकलमधून प्रवास करताना एसी लोकलप्रमाणेच अनुभव येईल फक्त यामध्ये एसी नसणार आहे. या लोकलमधील प्रवास सुरक्षित असेल. मुंबई उपनगरीय नेटवर्कवर सध्या १७ एसी लोकल धावतात. तसंच, रेल्वे मंत्रालयाने मुंबई उपनगरीय नेटवर्कसाठी प्रत्येकी १२ कोचचे २३८ लोकल रॅक तैनात करण्यास मंजुरी देखील दिली आहे. या लोकल खरेदी प्रक्रिया सुरू असून २३८ रॅकसाठी १९,२९३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.