डॉ. आनंद नाडकर्णी यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन
मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्ती क्षेत्रातील मोठे योगदान
साहित्य आणि नाट्य क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी
समाजप्रबोधनासाठी आयुष्यभर प्रयत्न
प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ, लेखक आणि समाजभिमुख विचारवंत डॉ. आनंद नाडकर्णी यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन. मागील आठवड्यात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर अचानक प्रकृतीत गुंतागुंत निर्माण होऊन त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन आज सकाळी १०.३० वाजता ठाणे येथील सप्तसोपान येथे घेता येणार आहे.
डॉ. नाडकर्णी यांनी मुंबईतून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठातून मानसोपचारशास्त्र विषयात एमडी पदवी प्राप्त केली. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ते मानसोपचार क्षेत्रात कार्यरत होते. मानसिक आरोग्याविषयीची जाणीव समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या कामाची व्याप्ती वैद्यकीय उपचारांपासून ते सामाजिक जनजागृतीपर्यंत पसरलेली होती.
नाडकर्णी पुण्यातील ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रां’चे संस्थापक सदस्य होते. व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. याशिवाय त्यांनी लेखन आणि नाट्य क्षेत्रातही स्वतःची वेगळी छाप निर्माण केली. ‘गद्धेपंचविशी’ आणि ‘विषादयोग’ या त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत. तसेच ‘रंग माझा वेगळा’ आणि ‘असेच आम्ही सारे’ ही व्यावसायिक नाटके त्यांनी लिहिली, तर ‘मयसभा’ या नाटकाला लेखनासाठी गौरव मिळाला.
नाडकर्णी यांच्या कथासंकल्पनेवर आधारित ‘गेट वेल सून’ या नाटकाची ‘मिफ्ता’च्या नाट्य विभागात त्या वर्षातील सर्वोत्तम १० नाटकांत निवड झाली होती. त्यांच्या कार्यातून मानसिक आरोग्य, सर्जनशीलता आणि समाजप्रबोधन यांचा अनोखा संगम दिसून येतो. डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाने वैद्यकीय आणि साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्याचा वारसा आणि विचार पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.