

डोंबिवली पश्चिमेतील टेल्कोसवाडी परिसरात तरुणाच्या हत्येमागील गूढ २४ तासांच्या आत उकललं आहे. पोलीस तपासात खळबळजनक माहिती उघड झाली आहे. जुन्या भांडणाच्या वादातून तरुणाची हत्या झाली होती. विष्णूनगर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि तिघांच्या मुसक्या आवळल्या. तसेच दोन अल्पवयीन मुलेही या हत्या प्रकरणात सामील असून, त्यांनाही ताब्यात घेतले. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी मृत मुलाच्या कुटुंबीयांनी केली आहे.
१९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११. १५ वाजताच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेतील टेल्कोसवाडी परिसरात ही भयंकर घटना घडली. सन्नी सिंह आणि साहिल गायकवाड हे मित्र होते. साहिलने सनी सिंह याला मावसभाऊ गुड्डू (अर्थव) हिवाळे याच्याशी झालेल्या भांडणाची माहिती दिली होती. या वादात मारहाण झाल्याचेही सांगितले. दुसऱ्या दिवशी आरोपी दिशांत गायकवाड याने भांडण मिटवण्यासाठी साहिल गायकवाडला फोन करून डोंबिवली पश्चिमेकडील टेल्कोसवाडी येथे येण्यास सांगितले.
दोन्ही गटांनी भांडण मिटल्याचं सांगितलं. त्यानंतर दोन्ही गटातील तरूण तिथून निघून गेले. पण मनात राग होता. रात्री पावणे अकराच्या सुमारास साहिल आपल्या मित्रांसह टेल्कोसवाडी येथे जात असताना हर्षल गिरी, दिशांत गायकवाड, चिराग सावंत, कमलेश यांच्यासह दोन अल्पवयीन मुलं त्या ठिकाणी आले. साहिल आणि त्यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली. वाद टोकाचा झाला. हर्षल गिरी, दिशांत गायकवाड, चिराग सावंत आणि कमलेशने साहिलला मारहाण सुरू केली.
साहिलसोबतच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी हर्षलने धारदार चाकूने साहिलवर हल्ला चढवला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णूनगर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेत कारवाई केली.
या प्रकरणात हर्षद गिरी, दिशांत गायकवाड आणि कमलेश यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती एसीपी विजय मराठे यांनी दिली. दोन्ही अल्पवयीन बालकांना बाल न्याय मंडळ, भिवंडी येथे हजर करण्यात आले. त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.