Thane Crime : वर्गमित्रांनीच केला घात; संध्याकाळच्या वेळेला घराबाहेर बोलावलं, निर्जनस्थळी नेलं अन्... धक्कादायक कारण उघड

Thane Murder Case : दोघेही अल्पवयीन, दोघांचेही वय वर्षे १७. पण डोक्यात खतरनाक प्लान शिजला. त्याचा शेवटही तितकाच भयंकर केला. पण गुन्हा कधी लपत नाही, तसाच त्यांनी केलेला का क्रूर गुन्हा लपला नाही. ठाण्यात दृश्यम चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असं थरकाप उडवणारं हत्याकांड उघडकीस आलंय.
Thane Murder Case
Thane Crime SAAM TV
Published On: 
Summary

ठाण्यातील धक्कादायक हत्याकांड

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

सोन्याच्या चेनसाठी हत्या

क्राइम, थ्रिलर आणि सस्पेन्स... एखाद्या 'मर्डर मिस्ट्री'वर आधारित चित्रपटाच्या कथानकासारखं भयानक हत्याकांड ठाण्यात घडलंय. बारावीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनी आपल्याच वर्गातल्या मित्राची क्रूर हत्या केल्याचं उघड झालंय. हत्या केल्यानंतर दृश्यम चित्रपटातील कथेचा आधार घेत या दोघांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. वर्गमित्राच्या गळ्यातील सोन्याची चेन घेऊन जीवाची चैन करण्यासाठी त्यांनी ही हत्या केली.

मित्राचा बर्थडे सेलिब्रेशन अन् बाईकसाठी भयंकर कृत्य

पोलिसांच्या माहितीनुसार, बारावीत शिकणाऱ्या अवघ्या १७ वर्षांच्या दोन मुलांनी आपल्याच वर्गमित्राची हत्या केली. या वर्गमित्राच्या गळ्यात ७ ग्रॅम सोन्याची चेन होती. ती विकून मिळणाऱ्या पैशांतून मित्राचा बर्थडे साजरा करायचा होता, तसंच बाईक खरेदी करायची होती. त्यामुळे या दोघांनी त्याची हत्या घडवून आणली. धक्कादायक म्हणजे, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह जाळला. तसेच मोबाइल धावत्या बसमध्ये फेकला.

संध्याकाळी घराबाहेर गेला तो परतलाच नाही

दोन्ही अल्पवयीन मुले ही ठाण्याच्या आझाद नगरात राहतात. या दोघांनाही कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगा २४ सप्टेंबरला संध्याकाळी ७ वाजता घराबाहेर पडला होता. पण तो घरी परतलाच नाही. मुलगा घरी न आल्याने चिंताग्रस्त झालेल्या वडिलांनी दुसऱ्या दिवशी पोलिसांत धाव घेतली. मुलगा बेपत्ता झाल्याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अपहरणाची नोंद केली.

Thane Murder Case
Driverless Metro : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पहिल्यांदाच धावणार ड्रायव्हरलेस मेट्रो; मार्ग आणि स्थानके कोणती?

दिशाभूल करणारी माहिती

पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. पीडित मुलाला ब्रम्हांड सर्कल येथे एका अनोळखी मुलासोबत स्कूटरवरून जाताना बघितल्याचं या दोघांमधील एका संशयित आरोपीनं पीडित कुटुंबीयांना आणि पोलिसांना सांगितलं होतं. पण आपल्यावर कुठलाही संशय येऊ नये यासाठी आपल्यालाही प्रचंड दुःख झालं आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

८०-९० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले

पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आसपासच्या परिसरातील जवळपास ८० ते ९० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले. पण बेपत्ता मुलगा कुठेही दिसून आला नाही. त्यामुळे पोलिसांचा या दोन मुलांवरील संशय अधिक बळावला. त्यांनी एका बाजूने तपास सुरूच ठेवला. मोबाइल फोनमधील डेटा आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी पुन्हा संशयित मुलांकडे चौकशी केली. या दोघांपैकी एकानं अखेर केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि या धक्कादायक हत्याकांडाचा उलगडा झाला.

Thane Murder Case
Maharashtra Politics: मोठी बातमी! दसऱ्यानंतर शिवसेनेत होणार मोठे फेरबदल, एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देणार

२४ सप्टेंबरच्या रात्री नेमकं काय घडलं?

संशयित आरोपींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी २४ सप्टेंबरच्या रात्री मुलाला सिगारेट पिण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. त्याला घोडबंदर रोडवरील ब्रम्हांड फेज २ नजीकच्या निर्जन ठिकाणी घेऊन गेले. तिथे त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा दगडाने ठेचला. धक्कादायक म्हणजे, हे दोघे पुन्हा घटनास्थळी गेले. पुरावाच नष्ट करण्यासाठी या दोघांनी मृतदेहावर पेट्रोल ओतून तो जाळला. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्याठिकाणी पोलिसांना अर्धवट जळालेला मृतदेह सापडला.

कट रचला पण फसला...

मुलाच्या हत्येनंतर या दोन्ही आरोपींनी आणखी एक कट रचला. पण तो फसला. आरोपींनी मुलाची हत्या केल्यानंतर त्याचा फोन फोडला आणि एका धावत्या बसमध्ये फेकून दिला. पोलिसांनी लोकेशन ट्रॅक केला तरी तो दुसरीकडे दाखवला जाईल आणि पोलिसांची दिशाभूल होईल, या उद्देशाने त्यांनी हे कृत्य केले. या दोघांनीही वर्गमित्राची हत्या का केली याची माहिती समोर आल्यानंतर तर सगळेच हादरले. मुलाच्या गळ्यात ७ ग्रॅमची सोन्याची चेन होती. ती विकून साधारण एक लाख रुपये मिळणार होते. त्या पैशांतून मित्राचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी, तसेच नवीकोरी बाइक खरेदी करण्यासाठी त्यांनी हे हत्याकांड घडवून आणलं, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात पोलिसांनी हत्येसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com