

चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्राच्या कायापालटासाठी सरकारकडून रोडमॅप तयार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाकणला भेट देऊन रस्ते दुरुस्तीची पाहणी केली.
वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना
वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे चाकणमधील कंपन्यांनी स्थलांतर रोखण्यासाठी सरकार कामाला लागलंय. चाकण-शिक्रापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा मोठा फटका उद्योजकांना बसत आहे. वाहतूक कोडींमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी उपमुख्यमी एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर काम करत आहेत . आज उपमुख्यमंत्र्यांनी आज तळेगाव, चाकण येथे भेट देवून रस्त्यांची दुरुस्ती कामाची पाहणी तसेच उद्योजकांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि येथील उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी शासन पूर्णपणे सकारात्मक आहे. उद्योजकांना पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तातडीची आणि दीर्घकालीन पावले उचलली जात असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.
उपमुख्यमंत्र्यांनी द्योजकांच्या प्रतिनिधींसमवेत घेतलेल्या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, विधान परिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार शरद सोनवणे, आमदार बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह चाकण व तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
चाकणमधील कामांची पाहणी दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्र्यांनी औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी होणाऱ्या विविध ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली.तसेच सद्यस्थितीची माहिती घेतली. यादरम्यान त्यांनी एम-६० हार्डनरचा वापर करून खड्डे बुजवण्याचे काम आणि पावसाने खराब झालेल्या रस्त्यांवर थेट कास्टिंग केलेले पॅचेस बसवण्याच्या कामाची पाहणी केली. या नवीन तंत्रज्ञानामुळे कमी वेळात रस्ता पूर्ववत करून त्यावरून अवजड वाहने सोडणे शक्य होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पावसाळ्यात पारंपरिक डांबरीकरण टिकत नसल्याने यावर मात करण्यासाठी जिओ पॉलिमर टेक्नो पॅच आणि एम-६ आरएमसी विथ हार्डनरचा वापर केला जात आहे. जिओ पॉलिमर मिश्रणाला अर्धा ते पाऊण तासातच सेट होत असल्याने खड्डे भरल्यानंतर तातडीने वाहतूक सुरू करणे शक्य होत आहे. तसेच सर्वाधिक खराब झालेल्या ठिकाणी प्री-कास्ट पॅनेल ट्रेलरद्वारे आणून थेट बसवण्यात येत आहेत.
औद्योगिक क्षेत्रातील समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष नोडल समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक आता दर शुक्रवारी होणार आहे. रस्ते, ड्रेनेज, फुटपाथ आणि स्ट्रीट लाईट्ससह पायाभूत सुविधांच्या विकासावर या समितीमार्फत भर दिला जाईल. तसेच चाकणमध्ये येणाऱ्या वाहनांची ये-जा सुलभ व्हावी यासाठी तळेगाव ते शिक्रापूर या ५४ किलोमीटर मार्गाची दुरुस्ती, नाशिक फाटा ते राजगुरुनगर रस्ता आणि अंतर्गत रस्ते बांधणीला गती दिली जाणार आहे. कामगारांच्या प्रवासाचा वेळ वाचावा यासाठी औद्योगिक क्षेत्रात क्लस्टरच्या माध्यमातून कामगार वसाहती (टाउनशिप) उभारण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
चाकण परिसरातील रस्ते, पाणी, वीज आणि ड्रेनेज समस्यांवर मात करण्यासाठी प्रशासनाची व्यापक योजना.
खड्डेमुक्तीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर:
पावसाळ्यात तात्काळ रस्ते दुरुस्तीसाठी जिओपॉलिमर टेक्नोपॅच आणि प्रीकास्ट काँक्रीट पॅनेलचा यशस्वी वापर; ठाणे-नाशिक महामार्गाच्या धर्तीवर चाकणमध्ये प्रयोग.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली २ उच्चस्तरीय समित्या:
PMRDA, MIDC, PWD, NHAI या सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राखण्यासाठी समिती गठीत.
चाकणला मेट्रोने जोडणार:
नाशिक फाटा–चाकण–राजगुरूनगर आणि तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्गावर मेट्रोच्या व्यवहार्यता तपासणी व डीपीआर तयार करण्याचे महामेट्रोला निर्देश.
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पर्यायी मार्ग व सायकल ट्रॅक:
अंतर्गत रस्ते रुंदीकरण, पदपथ, सायकल ट्रॅक तसेच PMRDA च्या पर्यायी रस्त्यांच्या कामाला गती.
कचरा व पाणी समस्येवर तातडीचे उपाय: कचरा प्रक्रियेसाठी नवीन जागा व यंत्रणा; पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढील आठवड्यात पाणीपुरवठामंत्र्यांचा दौरा.
उद्योगांचे स्थलांतर होणार नाही:
प्रशासनाच्या तत्पर निर्णयांमुळे उद्योजक समाधानी;
एकही उद्योग चाकणबाहेर जाणार नसल्याची उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही.
शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच भूसंपादन: बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जाईल, जबरदस्तीने भूसंपादन होणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.