
मराठी भाषा आणि महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. मराठी भाषा विजय दिवसानिमित्त एकाच मंचावर येत त्यांनी वरळीच्या डोम सभागृहात मेळावा केला. यावरून त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ठाकरे बंधूच्या एकत्र येण्यावर सडकून टीका केली आणि त्यासाठी त्यांनी रुदाली हा शब्द वापरला. यावरूनचा आता सामनाच्या अग्रलेखातून फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. त्याचसोबत यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका करण्यात आली. मुंबईतला मराठी मर्दांचा उसळलेला सागर देवेंद्र फडणवीस यांना ‘रुदाली’ वाटत असेल तर त्यांनी स्वतःची ‘रुदाली’ सुरूच ठेवावी. फडणवीसांची ‘रुदाली’ म्हणजे महाराष्ट्राचा आणि मराठी माणसांचा आवाज नाही!, असे म्हणत अग्रलेखातून फडणवीसांना खडेबोल सुनावण्यात आले आहेत.
सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला जशाच तसं उत्तर देण्यात आले आहेत. 'देशात गेल्या १० वर्षांपासून नरेंद्र मोदी यांची ‘रुदाली’ सुरू आहे. इतकी मोठी सत्ता हाती मिळूनही आजही पंडित नेहरू, गांधी कुटुंबाच्या नावाने खडे फोडायचे आणि स्वतःचे अपयश झाकण्यासाठी रडायचे यासारखी दुसरी ‘रुदाली’ नसेल. नरेंद्र मोदी रडू लागले की, देशात इतरांचे रडगाणे सुरू होते आणि देशात दुःखाचा माहौल निर्माण होतो. भारतासारख्या महान देशाच्या मर्द गर्जनेची यांनी ‘रुदाली’ केली.', अशा शब्दात अग्रलेखातून पीएम मोदी यांनाच चिमटे काढण्यात आले आहेत.
मराठी भाषा विजय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमावर फडणवीसांनी केलेल्या टीकेवर उत्तर देताना अग्रलेखात असे देखील म्हटले आहे की, ‘ठाकरे बंधू’ एकत्र आले आणि मराठी जनांचा अवघा रंग एक झाला याचे दुःख महाराष्ट्राच्या शत्रूंना वाटणे साहजिकच आहे. वरळीच्या ‘डोम’ सभागृहात आणि बाहेर मराठी एकजुटीचे विराट दर्शन भारताने पाहिले. हा सोहळा शिवतीर्थावर झाला असता तर तेही मराठी उत्साहापुढे तोकडेच पडले असते, पण काही कपाळ करंट्यांना मराठीचा हा जल्लोष सहन झाला नाही. काहींना ठसके लागले, काहींना मळमळले, काहींना जळजळले. काही जण भांग मारल्याप्रमाणे बडबडू लागले. काही जण झोपले ते अद्यापि उठले नाहीत. मुख्यमंत्री फडणवीस यांना हे सर्व विकार एकाच वेळी झाले आणि त्यात मराठी एकजुटीच्या द्वेषाची त्यांना कावीळ झाली.'
ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमावर टीका करताना फडणवीस यांनी रुदाली हा शब्द प्रयोग केला. त्यावरून अग्रलेखातून सडकून टीका करण्यात आली आहे. ‘ठाकरे’ नेतृत्वाखाली जमलेल्या मराठी मेळ्यास फडणवीस ‘रुदाली’ असे म्हणतात. त्यांनी हे भाष्य माऊलींच्या पंढरपुरात केले. मेळाव्यात मराठीचा विजयोत्सव नव्हता तर ‘रुदाली’ होती, असे ते म्हणाले. ज्यांना मराठी जनांच्या विजय गर्जना हे ‘रुदाली’ म्हणजे रडगाणे वाटते अशा विचाराचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या गादीवर बसले आहेत. ‘रुदाली’ हा शब्द मूळ मराठी भाषेतला नाही. हा शब्द त्यांनी हिंदी शब्दकोशातून उसना घेतला.', असा टोला देखील फडणवीसांना अग्रलेखातून लगावण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.