शाळा सोडल्याच्या दाखल्यातील चुका दुरुस्त करण्याचा मार्ग मोकळा
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या पूर्णपीठाने विद्यार्थ्यांच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिला
नियमानुसार दुरुस्ती करता येणार
केवळ विद्यार्थी शाळा सोडून गेला आहे या कारणावरून रेकॉर्ड दुरुस्ती नाकारता येणार नाही
शाळा सोडल्यानंतर शालेय रेकॉर्ड किंवा शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रातील चूक दुरुस्त करता येत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण, नोकरी किंवा इतर महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, आता अशा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण न्यायालयाने शाळा सोडल्याच्या दाखल्यावर चुका असल्यास त्या दुरुस्त करता येऊ शकतात असा निर्णय दिला आहे.
शाळेतील रेकॉर्डमध्ये नजरचुकीने किंवा अनवधानाने झालेली चूक विद्यार्थी शाळा सोडल्यानंतरही दुरुस्त करता येऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या पूर्णपीठाने दिला आहे. या निर्णयामुळे शाळा सोडल्यानंतर प्रमाणपत्रातील नाव, जन्मतारीख किंवा अन्य नोंदींमध्ये चूक आढळलेल्या विद्यार्थ्यांसाठी दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. केवळ संबंधित विद्यार्थ्याने शाळा सोडली आहे, या कारणावरून त्याला रेकॉर्ड दुरुस्तीपासून वंचित ठेवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
हा महत्त्वपूर्ण निर्णय जालना जिल्ह्यातील जनाबाई हिमतराव ठाकूर यांच्या प्रकरणातून समोर आला. त्यांच्या शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रातील चूक दुरुस्त करण्यासाठी त्यांनी माध्यमिक शिक्षण विभागाकडे अर्ज केला होता. मात्र, शाळा सोडल्यानंतर शालेय रेकॉर्डमध्ये दुरुस्ती करता येत नाही, असे सांगत विभागाने त्यांचा अर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. या प्रकरणात शासनाने माध्यमिक शाळा संहितेतील नियम २६.३ आणि २६.४ यांचा आधार घेतला. विद्यार्थ्याने शाळेत शिक्षण घेत असताना रेकॉर्डमध्ये दुरुस्ती करता येते; मात्र शाळा सोडल्यानंतर अशी दुरुस्ती करता येत नाही, अशी शासनाची भूमिका होती.
दरम्यान, औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठाच्या यापूर्वीच्या निर्णयांमध्ये या मुद्द्यावर वेगवेगळी मते असल्याचे समोर आले. त्यामुळे कायदेशीर स्थिती स्पष्ट करण्यासाठी हे प्रकरण पूर्णपीठाकडे सोपवण्यात आले. पूर्णपीठाने स्पष्ट केले की, चूक जाणीवपूर्वक केलेली नसून नजरचुकीने किंवा अनवधानाने झाली असेल, तर केवळ विद्यार्थ्याने शाळा सोडली आहे म्हणून ती चूक कायम ठेवता येणार नाही. संबंधित विद्यार्थ्याला योग्य पुरावे आणि नियमानुसार ती दुरुस्त करून घेण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे चुकीच्या शालेय नोंदींमुळे भविष्यातील शिक्षण, नोकरी, व्यवसाय किंवा इतर महत्त्वाच्या संधींवर परिणाम होणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.