Santacruz Chembur Link Road completion date Mumbai : पावसाळ्यापूर्वी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईतील पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या 'सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड'चा (SCLR) दुसरा टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. यामुळे १०.८८ किमी लांबीचे 'एससीएलआर' मार्गिका नेटवर्क पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर असून, हा मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर या भागातील वाहतूक कोंडीची समस्या कायमची दूर होईल.
बीकेसी ते वाकोला फाटा हा टप्पा सुमारे १.४ किमी लांबीचा असला, तरी त्यात ५०० मीटरचा चार पदरी उन्नत मार्ग (Elevated Road) आणि ९०० मीटरच्या दोन पदरी जोडमार्गाचा समावेश आहे. सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड पूर्ण झाल्यामुळे बीकेसीमार्गे 'ईस्टर्न एक्सप्रेस हायवे' आणि 'वेस्टर्न एक्सप्रेस हायवे' थेट जोडले जातील. हा संपूर्ण मार्ग सिग्नल-मुक्त असल्याने सांताक्रूझ, वाकोला, कलिना, कुर्ला आणि चेंबूर दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे.
वाकोला नाल्यावर ५४ मीटरचे दोन 'जुळे कंपोझिट गर्डर' टाकून या प्रकल्पाचा अंतिम दुवा साधण्यात आला आहे. यामुळे विविध उन्नत मार्ग एकत्र जोडून सुमारे ११ किलोमीटरचा एक सलग कॉरिडॉर तयार झाला आहे. हा विभाग बीकेसीमधील 'भारत डायमंड बोर्स'ला थेट वाकोलाशी जोडतो. अत्यंत गजबजलेल्या शहरी भागात आणि नाल्यावरील पुलावर हे काम करणे आव्हानात्मक होते. हे गर्डर बसवण्यासाठी अभियंत्यांनी ७०० मेट्रिक टन आणि ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेनचा वापर केला. प्रत्येक गर्डर ५४ मीटर लांब, ८.५ मीटर रुंद असून त्याचे वजन सुमारे ३५८ टन आहे; ज्याला ३.१३ मीटर खोलीच्या तीन उभ्या गर्डरचा आधार देण्यात आला आहे.
सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होईल. प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. वाहतूककोंडीत थांबण्याची गरज लागणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड प्रकल्पामुळे संपूर्ण मुंबईत जलद आणि अधिक कार्यक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण होण्यास मदत होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला प्रवाशांची जीवनवाहिनी म्हटले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.