मनोज तांबे, साम टीव्ही
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मिरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली आहे. माजी नगरसेविका नर्मदाताई वैती यांनी आपल्या शेकडो समर्थक आणि कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याच्या पक्षप्रवेशामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. आमदार नरेंद्र मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत 15 ऑगस्ट रोजी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना शहर संघटक प्रसाद सुर्वे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
नर्मदाताई वैती यांना मिरा-भाईंदरच्या राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी २००७ ते २०१७ या दहा वर्षांच्या कालावधीत भाईंदर पूर्वेच्या नगरसेविका म्हणून काम केले आहे. तसेच मिरा-भाईंदर महापालिकेच्या महिला व बालकल्याण उपसभापतीपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. मागील सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती.
दरम्यान, कुठल्याही निवडणुका तोंडावर नसताना वैती आणि सुर्वे यांच्यासारख्या अनुभवी पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश हा शिवसेनेसाठी आश्चर्यकारक धक्का मानला जात आहे. दुसरीकडे, या पक्षप्रवेशामुळे आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली मिरा-भाईंदरमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मिरा भाईंदर हा प्रामुख्याने शिवसेनेचे नेते तथा मंत्री प्रताप सरनाईक यांचा मतदारसंघ आहे. याच ठिकाणी स्थानिक पातळीवर भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांच्यात नेहमीच वाद दिसून येतो. दोघांचे एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळतात. तसेच निवडणुकीच्या वेळी दोन्ही नेते एकमेकांवर वैयक्तिक टीका करतात. त्यामुळे अनेकवेळा भाजप आणि शिवसेनेमधील वाद चव्हाट्यावर आलाय. अशातच आमदार मेहता यांनी शिवसेनेचे नेते गळाला लावल्याने याचे राजकीय पडसाद काय उमटतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.