FAO: इटलीतील रोम येथे सुरू झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्या (FAO) पहिल्या 'ग्लोबल कॉन्फरन्स ऑन स्मार्ट फार्मिंग 2026' मध्ये बारामतीच्या ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट (ADT) च्या संशोधनाची विशेष दखल घेण्यात आली आहे. या परिषदेला ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे आणि प्रा. योगेश फाटके यांनी उपस्थिती लावली.
१ ते ३ जुलैदरम्यान होणाऱ्या या परिषदेत 'शाश्वत कृषी-अन्न प्रणालीसाठी डेटा आणि तंत्रज्ञानाचा वापर' या विषयावर जागतिक स्तरावरील तज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि धोरणकर्ते विचारमंथन करत आहेत. उद्घाटन सत्रात FAOचे महासंचालक क्यू डोंग्यू यांनी हवामान बदल, पाण्याची टंचाई आणि वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता स्मार्ट फार्मिंग ही काळाची गरज असल्याचे सांगितले. AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ लघु व सीमांत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यावर त्यांनी भर दिला.
परिषदेत संयुक्त राष्ट्रांच्या पाणी विषयक विशेष दूत रेत्नो एल. पी. मार्सुडी यांनी शेतीतील पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान, उपग्रह आणि सेन्सरच्या वापराचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेच्या महासंचालक यव्होन पिंटो यांनी AI आणि रिमोट सेन्सिंगच्या मदतीने खतांचा वापर कमी करून उत्पादन वाढविण्याचे संशोधन सादर केले. याशिवाय स्वयंचलित ड्रोन, अचूक पेरणी यंत्रे, Tiny AI, न्यूक्लिअर आणि समस्थानिक तंत्रज्ञानाद्वारे अन्नसुरक्षा व शाश्वत शेतीसंदर्भातील विविध संशोधन निष्कर्ष परिषदेत मांडण्यात आले.
युरोपियन कृषी यंत्रसामग्री संघटनाचे उपाध्यक्ष मिस्टर कार्लो लॅम्ब्रो यांनी शेतीमध्ये स्वयंचलित ड्रोन, अचूक पेरणी यंत्रे आणि डेटा-ड्रिव्हन मशिनरीचा वापर वाढवण्याचे आवाहन केले, ज्यामुळे मजुरांच्या टंचाईवर मात करता येईल. तर,FAO चे महासंचालक बेथ बेचडोल यांनी डिजिटल दरी मिटवण्यावर भर दिला. तंत्रज्ञानाचा विकास होत असताना महिला आणि तरुण शेतकऱ्यांना या प्रवाहात समाविष्ट करणे, त्यांच्यात डिजिटल कौशल्ये विकसित करणे व राजकिय इचछाशक्ती अत्यंत आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.
दरम्यान, ADT बारामतीने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि मायक्रोसॉफ्ट यांच्या सहकार्याने १० हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या AI आधारित Precision Agriculture प्रकल्पाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या प्रकल्पातून उत्पादनात दुप्पट वाढ, ४० ते ५० टक्के पाणी बचत, ३० टक्क्यांपर्यंत खत बचत आणि जमिनीचे आरोग्य सुधारल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. हे निष्कर्ष परिषदेत मांडलेल्या अनेक जागतिक संशोधनांपेक्षाही अधिक प्रभावी असल्याचे FAOच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले.
FAOच्या उपमहासंचालक बेथ बेचडोल यांनी ADTचे संशोधन जागतिक धोरणांशी पूर्णपणे सुसंगत असल्याचे सांगितले. तसेच संस्थेचे सादरीकरण पाहिल्यानंतर FAOच्या पार्टनरशिप अँड कोलॅबोरेशन विभागाच्या प्रमुख किओरी अबी यांनी FAO इंडिया प्रमुखांना पुढील धोरणात्मक सहकार्याबाबत तातडीने निर्देश दिले. या परिषदेमुळे बारामतीच्या ADTच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.