

Maharashtra ZP election date : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेने आता थेट रणशिंग फुंकले आहे. राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये संघटन झपाट्याने मजबूत करण्यासाठी नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक संपर्क मंत्र्यांच्या खांद्यावर दोन जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे. तसेच त्यांना “जिंकाच, अन्यथा पर्याय नाही” असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी रात्री उशिरा प्रमुख मंत्र्यांची, पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगाव व नंदुरबार, उदय सामंत यांच्याकडे नाशिक व अहमदनगर, योगेश कदम यांच्याकडे ठाणे व पालघर, प्रकाश आबिटकर यांच्याकडे नांदेड व हिंगोली, भरतशेट गोगावले यांच्याकडे बीड, आशिष जयस्वाल यांच्याकडे जालना, प्रताप सरनाईक यांच्याकडे अमरावती व अकोला, संजय राठोड यांच्याकडे यवतमाळ व वाशिम, संजय शिरसाट यांच्याकडे भंडारा व गोंदिया, प्रतापराव जाधव यांच्याकडे नागपूर व वर्धा, शंभुराज देसाई यांच्याकडे गडचिरोली व चंद्रपूर तसेच दादा भुसे यांच्याकडे धुळे व बुलढाणा या जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या २२ जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण जिंकत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदांवर भगवा फडकवा, असे शिंदेंनी सांगितले.
प्रत्येक जिल्ह्यात टार्गेट फिक्स करून निवडणुकीची काटेकोर तयारी करायची, विजयाची टक्केवारी वाढवायची आणि जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार शोधून त्यांना पूर्ण ताकद द्या, असे एकनाथ शिंदेंनी स्पष्ट शब्दात नेत्यांना सांगितल्याची माहिती मिळाली. इतकेच नव्हे, तर ज्या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) किंवा भाजपचे पालकमंत्री आहेत, तिथेही मागे हटायचे नाही शासकीय समित्यांमध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांना स्थान मिळवून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शिवसेनेचे हे “संपर्क मंत्री अभियान” म्हणजे साधा कार्यक्रम नाही, तर स्थानिक सत्तेवर थेट कब्जा मिळवण्याची आक्रमक मोहीम आहे. संघटन प्रशासन आणि निवडणूक व्यवस्थापन या तिन्ही आघाड्यांवर एकाच वेळी जोरदार हल्ला चढवत शिवसेना आता मैदानात उतरली असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये हा धडाका किती प्रभावी ठरतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आनंदराव अडसुळ (शिवसेना नेते), प्रकाश पाटील (शिवसेना नेते), संजय मोरे (शिवसेना सचिव), भाऊसाहेब चौधरी (शिवसेना सचिव), मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादा भुसे, मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री आशिष जैस्वाल, आमदार डॉ. मनिषा कायंदे तसेच माजी आमदार रविंद्र फाटक उपस्थित होते. बैठकीला ऑनलाईन उपस्थिती म्हणून मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री संजय राठोड, मंत्री भरतशेठ गोगावले, मंत्री योगेश कदम, मंत्री संजय शिरसाठ आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सहभागी झाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.