

विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम
चंद्रपूरमध्ये तापमान 47.6 अंशांवर पोहोचले
उष्माघातामुळे 52 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय
नागपूर, अमरावती, यवतमाळसह अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा कहर
विदर्भात उष्णतेचा कहर झालाय. चंद्रपूरमध्ये तर तापमान 47 अंशांवर गेल्याने अंगाची लाहीलाही होतेय. उष्माघात अनेकांच्या जीवावर बेततोय. दुसरीकडे पशूपक्ष्यांचाही पाण्याविना तडफडून मृत्यू होतोय. पाहूया एक खास रिपोर्ट...
गेल्या काही दिवसांपासून आग ओकणाऱ्या सूर्याने भीषण रूप धारण केले. सलग चार दिवसांपासून ४७ च्या पुढे असलेला चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीचा पारा सोमवारी ४७.६ अंशावर गेला. दुसरीकडे नागपूरसह सहा जिल्ह्यांचे तापमान ४६ अंशाच्या पुढे गेले आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटांनी लोकांचे अंग अक्षरशः भाजून निघत आहे. दोन दिवसात चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती दोन तर अमरावतीत दोन अशा चौघांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आत्तापर्यंत उष्माघातामुळे मृत्यू झाल्याच संशय असणाऱ्यांमध्ये बेघर असलेल्या नागरिकांची संख्या जास्त आहे. आत्तापर्यंत विदर्भात उष्णतेच्या लाटेत ५२ जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
नागपुर - 25
अकोला - 4
अमरावती -9
यवतमाळ -8
वर्धा - 4
गोंदीया -1
गडचिरोली -1
सूर्य कर्कवृत्ताच्या अगदी जवळ असतो त्यामुळे त्याची दाहकता अधिक असते.दरवर्षी साधारणपणे 25 मे ते 2 जून दरम्यानचा हा काळ असतो. त्यामुळे या काळात तब्येतीची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं.
एकीकडे नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत असताना कडक उन्हाचा फटका पशुपक्ष्यांनाही बसू लागलाय. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यात 46 अंश तापमानामुळे 500हून अधिक वटवाघळांचा पाण्याविना तडफडून मृत्यू झालाय. दुसरीकडे अकोला जिल्ह्यातही जंगलातील पाणवठे कोरडे पडलेत. वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. तेल्हारा तालुक्यातील बेलखेड शेतशिवारात एका अस्वलाचा मुक्त वावर पाहायला मिळाला.
नवताप सुरू झाल्याने वन्यजीवांवरील हे संकट अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त होतीय. यंदाही जगातील उष्ण ठिकाणांमध्ये विदर्भातील अकोला, वर्धा, चंद्रपूरची नोंद झाली आहे. आणखी काही दिवस पारा चढता असणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना सतर्क राहणे...स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे हेच आपल्या हातात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.