Uddhav Thackeray : मते चोरून सत्तेवर आलात, हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचे सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले. ज्ञानेश कुमार, विद्यार्थी आंदोलन, मुंबईची मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली.
Maharashtra Politics
Uddhav Thackeray saam tv
Published On: 

मते चोरून हे लोक सत्तेवर आले आहेत. जर तुमच्यात खरी हिंमत असेल, तर ईव्हीएम बाजूला ठेवा आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, असे थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिले. मोदी-शहांचा जीव मुख्य निवडणूक आयुक्तांमध्ये अडकल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. तसेच विद्यार्थ्यांवरील दडपशाही, मुंबईचा ताबा घेण्याचा घाट आणि बनावट हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून सरकारची टीकेची झोड सोडली. शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला.

मोदी-शहांचा जीव ज्ञानेश कुमारमध्ये; रावणाचा वध जसा बेंबीत बाण मारून झाला...

जसे बिभीषण आणि श्रीरामाने सांगितले होते की रावणाचा जीव त्याच्या बेंबीत आहे, तसाच मोदी आणि शहा यांचा जीव ज्ञानेश कुमार (मुख्य निवडणूक आयुक्त) यांच्यात आहे. मते चोरून हे सत्तेवर बसले आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांना भेटल्याचे सांगत ते म्हणाले, मी अभिजित आणि दीपकेंना दिल्लीत भेटलो. तिथल्या मुलांना अमानुष मारहाण करण्यात आली आहे, त्यांच्या अंगावर वळ उठले आहेत, डोक्याला मार लागला आहे. मेलो तरी चालेल, पण आता मी मागे हटणार नाही, असा तो तरुणांचा रोष पेपर फुटीविरोधातील आणि या दीड-दोन दशकांच्या छळाविरोधातील होता.

Maharashtra Politics
Uddhav Thackeray Live : होय, आम्ही सत्ता बदलण्यासाठी उभे आहोत; उद्धव ठाकरेंचा मोदी सरकार अन् आयोगावर प्रहार

विद्यार्थ्यांना नक्षलवादी म्हणणारे, स्वातंत्र्यलढ्यातील तरुणांचा इतिहास विसरलेत का?

आंदोलनात उतरलेल्या तरुणांना 'दिमागी नक्षल' आणि गुन्हेगार ठरवणाऱ्यांवर ठाकरेंनी हल्लाबोल केला. ठाकरे म्हणाले, आंदोलनात उतरलेले सगळेच विद्यार्थी नव्हते असे नाही, पण गेल्या १२ वर्षांत लोकांनी भोगलेल्या छळाचा राग अनेकांच्या मनात आहे. आई-वडील आपल्या मुलांना घेऊन रस्त्यावर उतरत आहेत. आणि तुम्ही त्यांना काहीही बोलताय? याच वयाच्या तरुणांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. अनंत कान्हेरे, भगतसिंग, चाफेकर बंधू याच वयाच्या विशीतील तरुण होते. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा लढायला गेले, तेव्हा त्यांचे वय काय होते? अफजल खानने शिवरायांना 'पहाड का चूहा' म्हटले होते, पण २९ वर्षांच्या शिवरायांनी काय केले हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. आता तुम्ही मुलांना 'झुरळ' म्हणताय, ही कसली विकृती आहे?

Maharashtra Politics
Shivsena Dasara Melava : अमित शाह हेच खरे लॉरेन्स बिश्नोई; संजय राऊतांचा थेट केंद्रीय गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप

पोलिसांनी लांडग्यासारखे वागू नका, लाठीमार करताना विचार करा

आम्ही दाद मागत आहोत, पण बोलून न्याय मिळत नसेल तर जनतेने काय करायचे? लोकांना कोणताही शौक नाही की त्यांनी पोलिसांचा ससेमिरा पाठीशी लावून घ्यावा, घरी चोहोबाजूने संकटे ओढवून घ्यावीत. पण पोलिसांना माझे सांगणे आहे की, लांडग्यासारखे वागू नका. दंडुका उगारताना तो उद्या आपल्यावरच उलटणार नाही ना, याचा विचार करून वागा. तिरंगा यात्रा आहे म्हणून लोकांना घराघरात जाऊन नोटीस दिल्या जात आहेत. याउलट, शहरात उघडपणे मारेकरी फिरून गोळीबार करतात, तिकडे तुमचे लक्ष जात नाही.

घाटकोपरची भाषा गुजराती? हा महाराष्ट्र फक्त मराठी माणसाचा

मुंबईच्या अस्मितेवर बोलताना उद्धव ठाकरे संताप व्यक्त करत म्हणाले, इकडे येऊन म्हणतात की घाटकोपरची भाषा गुजराती आहे! अरे, महाराष्ट्र हे बहुभाषिक राज्य आहे, पण हा महाराष्ट्र मूळचा मराठी माणसाचा आहे. आमचे काही लोक सत्तेच्या मोहात शेपूट घालून बसले आहेत, ते आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? शेपूट घालत आणि बूट चाटत हे लोक महाराष्ट्राची भाषा आणि ओळख बदलायला निघाले आहेत. गुजरातला मुंबई मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, पण मराठी माणूस ताठ उभा राहिला म्हणूनच मुंबई महाराष्ट्राकडे राहिली. जर त्यांना असे वाटत असेल की शिवसेना संपवली की मुंबईचा घास सहज खाता येईल, तर लक्षात ठेवा, मराठी माणूस पोट फाडून बाहेर आल्याशिवाय राहणार नाही.

पुस्तकांमधून आंबेडकर-फुले काढण्याचा फतवा

ठाकरे म्हणाले की, विद्यापीठांमधून काही पुस्तके काढून घेतली जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुस्तकांत विष आहे, असे सांगून ती हटवण्यास सांगितले जात आहे. एखाद्या बिन-बनावटाच्या ट्विटर हँडलवरून ही मागणी होते आणि पंतप्रधान कार्यालय त्यावर गांभीर्याने फतवा काढते. समाज सुधारल्याशिवाय स्वातंत्र्य टिकत नाही. शिवसेनाप्रमुखांनी राजकारणात धर्म आणला, पण तो संकुचित नव्हता; तो ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचा होता. मराठी माणसाला आणि हिंदूंना आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. गाडगेबाबांच्या विचारांचे ते हिंदुत्व होते.

Maharashtra Politics
एकनाथ शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्री करणार, शिंदे गटाच्या २ बड्या नेत्यांचं मोठं विधान, दसरा मेळाव्यातील दाव्याने महायुतीत खळबळ

हातात काम नाही आणि जय श्री राम... हे आमचे हिंदुत्व नाही

बाबरी ढाचा पडला तेव्हा आजचे हे बोगस हिंदुत्व सांगणारे कुठे होते, असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले की, बाबरी पडली तेव्हा हे सगळे शेपूट घालत बसले होते. आमचे हिंदुत्व शेंडी जणांचे नाही, तर राष्ट्रप्रेमाचे आहे. जीवाची पर्वा न करता मैदानात धावणारा तो खरा शिवसैनिक आहे. आज धर्माचे राजकारण सुरू झाले आहे. 'हातात काम नाही आणि बोल जय श्री राम' - हे आमचे हिंदुत्व नाही! तर 'हाताला काम आणि मुखात जय श्री राम' हे आमचे अस्सल हिंदुत्व आहे. आमचे देशभक्त मुस्लिम असतील त्यांचा हिरवा रंग, दलित असतील त्यांचा निळा रंग, आणखी कोणी असेल त्यांचा रंग असेल; पण शेवटी आमचा सबका रंग आणि शान हा आमचा 'तिरंगा' आहे असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com