एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करू, असा ठाम विश्वास शिंदे गटाचे आमदार तथा मंत्री प्रताप सरनाईक आणि संजय बांगर यांनी व्यक्त केला. गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा सुरू झाला आहे. त्यापूर्वी प्रताप सरनाईक यांनी 'साम टीव्ही'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्या ५०० कोटींच्या आरोपांना उत्तर दिलेच, शिवाय एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करणार असल्याचे मोठे विधानही केले. त्यांच्या या विधानामुळे महायुतीमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सुरू झालाय. मेळाव्यापूर्वीच नेत्यांच्या विधानांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दसरा मेळाव्याच्या मंचावर सचिन अहिर, डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, श्रीरंग बारणे, ज्योती वाघमारे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित झाले आहेत. मेळाव्यापूर्वी मंत्री आणि आमदारांनी मीडियाशी संवाद साधताना आगामी काळात एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुकांमध्ये संख्याबळाच्या जोरावर आम्ही एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करू. तसेच जरांगे करत असलेले ५०० कोटींच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, ते आता राजकीय भाषा बोलत आहेत. दरम्यान, संतोष बांगर यांनीही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, ही प्रत्येक शिवसैनिकाची मनापासून इच्छा आहे.
मनोज जरांगे जे बोलतात त्यात काहीच तथ्य नाही. एकनाथ शिंदे यांनी सर्व प्रश्न मार्गी लावले आहेत, असे दीपक केसरकर म्हणाले. तर विजय शिवतारे म्हणाले की एकनाथ शिंदे हे 'देना बँक' आहेत, 'लेना बँक' नाही. जनताच याला उत्तर देईल. दरम्यान, खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, जरांगेंचे आरोप अत्यंत खोटे असून त्यांच्यामागे बोलवता धनी दुसराच कोणीतरी आहे.
जरांगेंच्या आरोपांमध्ये आता पूर्णपणे राजकीय वास येऊ लागला आहे. ते रंग बदलणारे म्हणून ओळखले जातील, असे योगेश कदम म्हणाले. तर सिद्धेश कदम म्हणाले की ५०० कोटींवर किती शून्य असतात, हे जरांगे यांना माहीत आहे का? त्यांनी पहिल्याच प्रश्नाचे उत्तर द्यावे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.