राज्यात बदलत्या हवामानामुळे तापमानात अनियमितता
अवकाळी पावसाचा शेती व आरोग्यावर परिणाम
सोनल प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी
उन्हाळ्यात पाणीटंचाईची शक्यता, प्रशासनाकडे मागणी
राज्यात मे २०२५ पासून सुरु झालेल्या पावसाने अगदी थंडीच्या दिवसांतही धुमाकूळ घातला. पावसाचा वाढलेल्या मुक्कामाने वातावरणात मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. तसेच डिसेंबर २०२५ पासून सुरु झालेली थंडी जानेवारी महिन्यातच कमी कमी होऊ लागली. शिवाय अवकाळी पावसाने देखील झोडपून काढले. फेब्रुवारी महिन्यात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता असून, राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज राज्यात अंशतः ढगाळ हवामान असून पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रासह राज्यात ढगाळ हवामान झाले आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने, कमाल आणि किमान तापमानात चढ - उतार होत आहेत. आज राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान सतत बदलणाऱ्या वातावरणाचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पिकांवर देखील बदलत्या हवामानामुळे गंभीर परिणाम होत आहे.
वाशिम जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांपैकी एक प्रकल्प असलेला सोनल प्रकल्पातील पाणीसाठा सध्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यंदा रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढल्यामुळे कालव्यावरून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा सुरू आहे. या वाढलेल्या उपशाचा थेट परिणाम प्रकल्पातील साठ्यावर दिसून येत असून,आतापर्यंत सुमारे ४० टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. सोनल प्रकल्पावर परिसरातील अनेक गावे अवलंबून असून शेतीसह पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही याच प्रकल्पातून केला जातो. मात्र पाण्याची मागणी वाढत असताना साठा वेगाने कमी होत असल्याने येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने वेळेत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.