

तेलंगणात जोतिबा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना
घटनेचे देशभरात पडसाद
मंत्री भुजबळ यांच्याकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून कारवाईची मागणी
तेलंगणामधील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यावर विटंबना झाल्याची घटना घडली. या घटनेचे संपूर्ण भारतात पडसाद उमटू लागले आहेत. जोतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. या निंदनीय कृत्याचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. या प्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले, 'तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापुर गावात क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यावर समाजकंटकांनी हल्ला केला आहे. त्यांनी केलेल्या विटंबनेची घटना निंदनीय आहे. त्यांच्या हीन कृत्याचा आणि सहभागी समाजकंटकांचा तीव्र निषेध करतो. ही फक्त जोतिबांच्या पुतळ्याची विटंबना नसून सामाजिक विचारांवर आणि समतेच्या मूल्यांवर केलेला आघात आहे'.
'या प्रकरणी मी तात्काळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदनाद्वारे या गुन्ह्यातील दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केलीये. जिथे विटंबना झाली, तिथेच महात्मा फुले यांचा भव्य पुतळा पुन्हा सन्मानपूर्वक स्थापित करण्यात यावा. या प्रकारच्या पुनरावृत्ती टाळण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करावी. जोतिबा फुले यांचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. सामाजिक न्याय आणि घटनात्मक मूल्यांच्या रक्षणासाठी या प्रकरणाची गंभीर दखल तेलंगणा राज्याच्या सरकारनेही घेतली पाहिजे, असे त्यांनी म्हटलं आहे.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
प्रकाश आंबेडकर यांनीही या घटनेचा निषेध केला. 'तेलंगनाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गांवात रास्व संघाच्या कार्यकर्त्यांनी महात्मा जोतिबा फुले यांची मूर्ती तोडण्याचा प्रयत्न केला. हा जोतिबा फुले यांच्यावर हल्ला नसून दलित, आदिवासी आणि ओबीसींवर हल्ला आहे. हा सामाजिक न्यायावर हल्ला आहे. हा वंचित आणि बहुजनांच्या समतेच्या आंदोलनावर हल्ला आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.