विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलं आहे. आज मंगळवारपासून राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. पहाटेपासूनच या संपाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. अकोला, अमरावती आणि अहमदनगर आणि धाराशिव जिल्ह्यातून धावणाऱ्या एसटी बसेस या डेपोमध्ये उभ्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला असून स्थानकावर गर्दी दिसून येत आहे.
अकोला (Akola) मध्यवर्ती बसस्थानकावर आज मंगळवारी सकाळी 6 वाजेपासूनच एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे एसटी बसेस या डेपोमध्येच उभ्या आहेत. अमरावती डेपोमधील काही कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच संपाची हाक दिली आहे. त्यामुळे नागपूरकडे जाणाऱ्या एसटी बसेस खोळंबल्या आहेत.
अमरावती (Amravati) जिल्हा मध्यवर्ती बसस्थानक आणि ग्रामीण भागातील सर्व एसटी डेपो आज सकाळपासूनच बंद ठेवण्यात आले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी डेपोबाहेरच आंदोलन सुरू केलंय. आपल्या मागण्यासाठी जोरदार घोषणा एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
या बंदमुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसून येत आहे. एसटी बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी निर्माण झाली असून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. शिर्डी तसेच संगमनेर डेपोतून धावणाऱ्या बसेस स्थानकावरच उभ्या आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब, भुमसह इतर बस डेपो पहाटेपासूनच बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतोय. सरकार जोरपर्यंत आमच्या मागण्या मान्य करत नाहीत. तोपर्यंत आम्ही संप माघार घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यातही या संपाला हळुहळू प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे लालपरीची चाके ठप्प होण्याची शक्यता आहे.
विशेष बाब म्हणजे यापूर्वी 2021 मध्ये महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी दीर्घकालीन संप पुकारला होता. तेव्हा तब्बल 54 दिवस एसटी बसची चाके थांबली होती. आता ऐन गणेशोत्सव काळात लालपरीला ब्रेक लागणार असल्याने गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसह सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.