सिंदगीजवळ बस-दुचाकीची भीषण धडक
पेट्रोल टँक स्फोटामुळे आग; युवक जिवंत जळाला
बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू
विश्ववभूषण लिमये, सोलापूर
कर्नाटकच्या विजयपूर जिल्ह्यातील सिंदगीजवळ आज अंगावर काटा आणणारा भीषण अपघात घडला. सरकारी बस आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली. यानंतर बसने पेट घेतला. या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच जिवंत जळून मृत्यू झाला. याप्रकणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यात कन्नोळी टोलगेटजवळ बसची समोरून येणाऱ्या दुचाकीशी जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात देवऱ्हिप्परगी तालुक्यातील मुळसावळगी गावचा रहिवासी अभिषेक सायबागौडा नागराळ (वय २२) हा दुर्दैवी युवक आगीच्या ज्वाळांत सापडून जिवंत जळाला.
धडकेच्या तीव्रतेमुळे दुचाकीच्या पेट्रोल टँकचा स्फोट होऊन आग लागली, त्यामुळे दुचाकीस्वाराला सावरण्याची संधीच मिळाली नाही. अपघात इतका भीषण होता की, काही क्षणांतच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली.
सुदैवाने, आग बसमध्ये पूर्णपणे पसरायच्या आधीच चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि प्रवाशांच्या तत्काळ बाहेर पडण्यामुळे बसमधील सर्व प्रवासी बचावले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या सिंदगी अग्निशामक दलाने आग विझवण्यात यश मिळवले. सिंदगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.