भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी भाजप आणि अजित पवारांच्या नेत्यांना गळाला लावून महायुतीला धक्क्यांवर धक्के देण्यास सुरुवात केलीय. त्यातच हर्षवर्धन पाटलांनंतर आता 14 ऑक्टोबरला रामराजे नाईक निंबाळकरांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे संकेत पवारांनी दिलेत. एवढंच नाही तर फलटणनंतर पुढील महिनाभर पक्षप्रवेशाच्या तारखा बूक असल्याचंही पवारांनी म्हटलंय. शरद पवार म्हणाले आहेत की, फलटणनंतर महिनाभर पक्षप्रवेशाच्या तारखा बूक आहेत.
फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकरांनी दोनच दिवसांपुर्वी आपली नाराजी उघड केली होती. एवढंच नाही तर तुतारी फुंकण्याचे संकेत दिले होते. त्यापार्श्वभूमीवर शरद पवारांनी थेट तारीखच जाहीर केलीय. मात्र दुसरीकडे अजित पवारांनी रामराजेंची भेट घेणार असल्याचं म्हटलंय.
तुतारी फुंकण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची रांग लागली असून फलटणनंतर महिनाभर आपल्या तारखा बूक असल्याचं पवारांनी म्हटलंय. मात्र महायुतीचे कोणते नेते तुतारी फुंकण्याची शक्यता आहे, हे जाणून घेऊ...
अजित पवारांचे आमदार बबन शिंदे मुलासाठी तुतारी फुंकण्याची शक्यता आहे. भाजप नेते अभिजीत पाटलांनी पवारांची भेट घेतल्याने तुतारी फुंकण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या पक्षाचे माजी आमदार राजेंद्र देशमुखांनी घेतली पवारांची भेट घेतली आहे. भाजपचे मधुकरराव पिचड आणि मुलगा वैभव पिचड तुतारी फुंकण्याची शक्यता आहे. पंढरपूरचे प्रशांत परिचारक पवारांच्या पक्षात जाण्याची शक्यता आहे. विखे विरोधक भाजपच्या राजेंद्र पिपाडांनी पवारांची भेट घेतली आहे.
लोकसभेनंतर आत्मविश्वास वाढलेल्या पवारांनी जुन्या सहकाऱ्यांना आपल्याकडे वळवायला सुरुवात केलीय. त्यामुळे आगामी विधानसभेपूर्वी महाराष्ट्रातील दिग्गज नेते तुतारी फुंकणार आहेत. त्याचे संकेत पवारांनी दिले असले तरी पवार महायुतीच्या किती नाराजांना सामावून घेणार आणि स्वपक्षातील बंडखोरी कशी टाळणार? यावर विधानसभेचं गणित अवलंबून असणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.