Shahapur Tourist Death: शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसरात पुन्हा एकदा पर्यटकाच्या मृत्यूची दुर्दैवी घटना घडली आहे. वरपडी नदीत पाय घसरून पडल्याने मुंबईतील २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पावसाळ्यात धबधबे आणि नद्यांमध्ये पर्यटन करताना निष्काळजीपणा किती जीवघेणा ठरू शकतो, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून काही तरुण शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसरात फिरण्यासाठी आले होते. पावसाळ्यात निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी त्यांनी वरपडी नदी परिसर गाठला. नदीच्या पाण्यात उतरून सर्वजण आनंद घेत असताना सोनू सिंग (वय २७) याचा अचानक पाय घसरला. त्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो नदीतील दगडावर आपटत पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेला.
ही घटना पाहताच परिसरातील स्थानिक तरुणांनी तातडीने धाव घेत सोनू सिंग याला पाण्याबाहेर काढले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. गंभीर दुखापत आणि पाण्यात वाहून गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्याच्या मित्रांवर आणि कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच डोळखांब परिसरातील हनुमान धबधब्यावर ढगफुटीसदृश पावसानंतर मोठी दुर्घटना घडली होती. त्या वेळी पाच पर्यटक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. त्यापैकी तिघांना स्थानिकांनी सुखरूप वाचवले, मात्र दोन जणांचा मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असतानाच पुन्हा एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांनी पर्यटकांना सतर्क राहण्याचे तसेच धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात नदी-नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह अचानक वाढू शकतो. त्यामुळे निसर्गाचा आनंद घेताना सुरक्षिततेचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.