साताऱ्यामध्ये ड्रंक अँड ड्राइव्हमुळे मायलेकींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील कोर्टी गावाच्या हद्दीमध्ये हा भीषण अपघात झाला. भरधाव क्रेनने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या मायलेकींचा जागीच मृत्यू झाला तर एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सव्वासातच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. रुक्मिणी परदेसी (३६ वर्षे), आर्या परदेसी (११ वर्षे) आणि गायत्री परदेसी या तिघी जणी दुचाकीवरून प्रवास करत होत्या. साताऱ्यावरून त्या कराडच्या दिशेने निघाल्या होत्या. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या क्रेनने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये तिघी जणी रस्त्यावर खाली पडल्या. तिघी देखील गंभीर जखमी झाल्या होत्या.
या अपघातामध्ये रुक्मिणी परदेसी आणि आर्या परदेसी या मायलेकींचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या गायत्री परदेसीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर क्रेन चालक फरार झाला. अपघाताची ही घटना घडली तेव्हा क्रेन चालक मद्यधुंद अवस्थेत होता. पोलिसांनी या अपघाताचा तपास करत क्रेन चालकाला अवघ्या काही तासांत अटक केली. या अपघाताचा तपास सातारा पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, साताऱ्यातील गोंदवले ते म्हसवड रस्त्यावर कारला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दिघंची गर्ल्स हायस्कूलच्या पर्यवेक्षिका जयश्री रामचंद्र देशमुख (५६ वर्षे) यांचा मृत्यू झाला. तर त्यांचे पती रामचंद्र देशमुख हे जखमी झाले. रविवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला होता. जयश्री देशमुख पतीसोबत आपल्या मुलाला भेटण्यासाठी गेले होते. त्यांचा मुलगा रोहित देशमुख नाट्य अभिनेता आहे. सोमवारी शाळा सुरु होणार असल्यामुळे त्या आपल्या घरी जात होत्या तेव्हा हा अपघात झाला. कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या साइड गार्ड पत्र्यात घुसली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या जयश्री यांचा मृत्यू झाला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.