
Devendra Fadnavis News : सातारा जिल्ह्यातील ज्या प्रकल्पांमुळे दुष्काळी भागांना पाणी मिळणार आहे अशा प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच म्हसवड-धुळदेव (ता.माण) औद्योगिक वसाहतीच्या कामाला गती देण्यात येईल, असे भाजपचे नेेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis In Karad) यांनी माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले. (Maharashtra News)
फडणवीस हे आज सातारा जिल्हा दाै-यावर आले हाेते. कराड येथील कृष्णा सहकारी बँकेच्या सभागृहात सातारा जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत व जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांचा आढावा फडणवीस यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
फडणवीस म्हणाले,पहिल्या टप्प्यात दुष्काळी भागात पाणी जाणाऱ्या प्रकल्पांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचबरोबर इतर जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांच्या कामांसाठीही शासन सकारात्मक असून टप्प्याटप्प्याने कामांना प्रशासकीय मान्यतेबरोबर निधीही उपलब्ध करून दिला जाईल.
या बैठकीत धोम-बलकवडी प्रकल्प, तारळी प्रकल्प, उरमोडी प्रकल्प, कुडाळी मध्यम प्रकल्प, वांग प्रकल्प, मोरणा गुरेघर मध्यम प्रकल्प, जिहे-कठापूर उपसा सिंचन योजना, हणबरवाडी व धनगरवाडी उपसा सिंचन योजना या योजनेअंतर्गत व प्रकल्पातर्गत सुरू व प्रलंबित असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
बेंगलोर-मुंबई कॉरिडोअरवर नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडोर डेवलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत म्हसवड-धुळदेव (ता.माण) येथे नव्याने औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात येणार आहे या वसाहतीच्या तांत्रिक बाबींना मंजुरी देण्यात येईल असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
या औद्योगिक वसाहतीला 3246.79 हेक्टर आर जमीन लागणार आहे. जी शासकीय जमीन आहे ती तात्काळ जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करावी.
सातारा एमआयडीसी मध्ये सब स्टेशन उभारण्यासाठी महापारेषणने त्यांच्याकडील 35 गुंठे जागा ही महावितरणला हस्तांतरित करावी. सातारा तालुक्यातील निगडी व वर्णे येथे नव्याने औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव शासनाकडे असून याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. तसेच सातारा एमआयडीसीमध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या पोलीस स्टेशनला प्रशासकीय मान्यता दिली जाईल अशी सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत केल्याचे सांगितले.
यावेळी बैठकीस खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर, आमदार प्रवीण दरेकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे (jaykumar gore), डॉ. अतुल भोसले (atul bhosale), जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, औद्योगिक विकास महामंडळाचे पुणे विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.
फडणवीसांची साईकडे गावास भेट
पाटण तालुक्यातील साईकडे गावास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. सरनौबत मानाजी मोरे यांचे हे गाव आहे. या गावात येण्याची उत्सुकता होती. आज या गावास भेट दिल्याचे समाधान वाटत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यावेळी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार प्रवीण दरेकर, साईकडे गावचे सरपंच सुवर्णा मोरे, उपसरपंच गणेश यादव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे सद्या राज्याचे नेतृत्व करत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत गावाच्या विकासासाठी सर्व ती मदत करू. गावासाठी वांग नदीच्या काठावर पूर संरक्षक भिंत बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी विभागाला योग्य त्या सूचना दिल्या जातील.
गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी दिलेल्या मागण्या पूर्ण करू. पूर संरक्षक भिंत बांधण्यासाठी वेळ लागेल पण तो पर्यंत गावात पुराचे पाणी येऊ नये यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी साईकडे गावात बांधण्यात येणाऱ्या पूर संरक्षक भिंतीच्या ठिकाणची स्थळ पाहणी केली. तसेच ग्राम दैवत श्री मसनाई देवीचे दर्शन घेतले.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.