
बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला २ महिने उलटले तरी देखील एक आरोपी अद्याप मोकाट आहे. याप्रकरणावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षाकडून आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे. अशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. देशमुख कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर 'बीडमध्ये कुणावरही हल्ला झाल्यास मला फोन करा.', असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी बीडच्या नागरिकांना केले आहे.
सुप्रिया सुळे यांच्यासमोर देशमुख कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. आम्ही खूप आनंदी होतो पण आता सावरणे अवघड झाले असल्याचे त्यांनी सुप्रिया सुळेंना सांगितले. सुप्रिया सुळे यांच्यासमोर संतोष देशमुख यांच्या आईला अश्रू अनावर झाले. आम्हाला न्याय पाहिजे आणि संरक्षण पाहिजे अशी मागणी देशमुख कुटुंबीयांनी केली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी मी तुम्हाला न्याय देणार असल्याचे म्हणत धीर दिला.
सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले की, 'आईला सगळ्यात जास्त दु:ख असतं आपलं मुलं जाण्याचं. हा राजकारणाचा विषय नाही. आपण यात माणुसकीच्या नात्याने न्याय मिळवून दिला पाहिजे. ६९ दिवस झाले न्याय मिळत नाही. माणुसकीच्या नात्याने हा लढा सुप्रिया सुळे लढणार आहे. महाराष्ट्रात आपण माणुसकी विसरलो आहोत का असं वाटत आहे. देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. मुख्यमंत्री कुटुंबीयांना भेटल्यानंतर ८ दिवसांत न्याय भेटेल असं वाटलं होतं. पण मुख्यमंत्र्यांना वेळ मागणार आहे आणि पदर पुढे करुन न्याय मागणार आहे.'
तसंच, 'तुम्ही आणि सगळे ताकतीने लढूया. आठ दिवसांपूर्वी आम्ही अमित शहा यांना भेटलो आहे. सत्याचा विजय झाला पाहिजे. जो कोणी आरोपी असेल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. सत्तेची आणि पैशाची मस्ती उतरलीच पाहिजे. तुम्हाला न्याय मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही. बीड जिल्ह्यातील ही गुंडागर्दी थांबली पाहिजे. हा आहे का विकास काय करत आहेत सत्ताधारी?', असा सवाल सुप्रिया सुळे यांनी सरकारला विचारला आहे.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, 'ही लढाई तुमची नाही आपल्या सर्वांची लढाई आहे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की तुमचे प्रशासन काय करतंय? याचे दररोज अपडेट द्या. फरार आरोपी कृष्णा आंधळे गेला कुठे? हा सापडत नाही हे शक्य तरी आहे का? दोन महीने झालं तरी तो सापडत नाही. कृष्णा आंधळे आणि अटक असलेल्या आरोपींचा सिडीआर पाहिजे. या खून प्रकरणात पोलिसांनी एखदाही पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली नाही. या देशात खंडणी हा मोठा गुन्हा आहे. वाल्मिक कराडला आधी अटक का झाली नाही..? खंडणी मागितली होती तेव्हाच का ईडी व सिबिआय लागली पाहीजे होती. मला महाराष्ट्र पोलिसांचा सार्थ अभिमान आहे.'
तसंच, ' ही लढाई महिलांनी हातात घेतली पाहिजे. हातात लाठण घ्या. तुम्ही अन्नत्याग करु नका. वेळ पडली तर आम्ही अन्नत्याग करू. बीडमध्ये आज नंतर कोणावर ही हल्ला झाला तर मला फोन करा. आम्हाला यात राजकारण करायचं नाही. कोणत्या व्यक्तीवर आरोप प्रत्यारोप करायचे नाही. आम्हाला न्याय पाहिजे. मुख्यमंत्री यांना प्रश्न आहे की तो सातवा आरोपी आहे कुठं? वाल्मीक कराडच्या मागे कोणाची तरी शक्ती आहे. वाल्मीक कराड याच्या मागे धनंजय मुंडेंची शक्ती आहे.', असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.