
सचिन जाधव, साम टीव्ही
पुणे : महायुतीत छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं नाही. त्यानंतर छगन भुजबळ यांनी उघड नाराजी व्यक्त केली. त्यानंतर भुजबळ यांनी जाहीर मेळाव्यात पक्षातील वरिष्ठ नेत्यांवरही तोफ डागली. भुजबळ यांच्या वक्तव्याने अजित पवार गटाची साथ सोडणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर छगन भुजबळ यांच्या भाजप प्रवेशाच्याही चर्चा सुरु झाल्या आहेत. आता याच चर्चांवर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं भाष्य केलं आहे.
सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात विकासकामांचं भूमिपूजन झालं. या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे यांनी राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलं. छगन भुजबळ यांच्यावर भाष्य करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'छगन भुजबळ राज्याचे वरिष्ठ नेते आहेत. ते कुठल्याही पक्षात असले तरी त्यांचं गेल्या 40-45 वर्षात राज्याला दिलेलं योगदान महाराष्ट्र कधी विसरणार नाही. शरद पवार यांच्या अनेक संघर्षात छगन भुजबळ उभे राहिले आहेत. मी आयुष्यभर विसरणार नाही. त्यांच्यावर मोठा अन्याय झालाय'.
'मला अजूनही तो दिवस आठवतो, त्यांना अटक झाली. त्यांच्या वेदना आणि संघर्ष जवळून पाहिला आहे. मी अनेकदा जेलमध्ये त्यांना पाहिलं आहे. त्यांचं कुटुंब फार दुःखातून गेलं आहे. त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. भुजबळ लढवय्या नेते आहेत. वयाने नेतृत्व आणि भुजबळ मोठे आहेत. आमचे भुजबळ यांच्या कुटुंबांसोबत कायम आहे', असेही त्या म्हणाल्या.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, 'मी कोणासोबत कौटुंबिक संबंध तोडत नाही. संघर्ष काळात मी त्यांचे दुःख जवळून पाहिलं आहे. अडचणीच्या काळात त्यांच्या कुटुंबांने भोगलं आहे, ते वेदनादायी आहे. त्यांच्या पक्षातील अंतर्गत संबंध आहेत. मला बाकी माहिती नाही. माझं पोट मोठं आहे. सगळ्या पोटातल्या गोष्टी ओठावर आणायचं नसतं. सगळं बोलायचं नसतं'.
दरम्यान, जानेवारीच्या आठ आणि नऊ तारखेला मुंबईत पक्षाची बैठक आहे. आम्हाला सगळ्यांना मुंबईला यायला सांगितल्या असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.