विजय पाटील, सांगली प्रतिनिधी
Sangli latest news : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील अंकले गावात तरसाने केलेल्या भीषण हल्ल्यात एका ७३ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. कोंडीबा दुधाळ असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते अंकले गावचे माजी पोलीस पाटील होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंडीबा दुधाळ हे काल नेहमीप्रमाणे रानात शेळ्या चरायला गेले होते. त्यावेळी अचानक एका तरसाने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात तरसाने त्यांच्या मांडीचा लचका तोडला, तसेच शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा केल्या. अतिरक्तस्त्राव आणि गंभीर दुखापतींमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
गेल्या काही दिवसांपासून अंकले आणि आसपासच्या परिसरात तरसाचा वावर मोठ्या प्रमाणावर दिसून येत होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच, जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (Post-Mortem) जत येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी रुग्णालयाच्या परिसरात नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. वन्यजीवांचा बंदोबस्त करण्याची तीव्र मागणी आता ग्रामस्थांमधून केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.