सांगलीमध्ये पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीची केली हत्या
हत्येनंतर रचला खोटा बनाव
पोलिसांच्या सखोल तपासात हत्या केल्याचे उघड
आरोपींना बेड्या
विजय पाटील, सांगली
पुण्यात केतन हत्याप्रकरण ताजे असतानाच दुसरीकडे सांगलीमधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधात अडथळा बनणाऱ्या पतीची पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडने मिळून हत्या केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे पतीच्या हत्येनंतर पत्नीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बनाव रचला. मात्र पोलिसांच्या मनात पाल चुकचुकल्याने तपासात हत्येचा उलगडा झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पल्लवी सर्जे आणि तिचा बॉयफ्रेंड दीपक आजमाने अशी आरोपींची नवे असून मृत व्यक्तीचे नाव आनंदा सर्जे (वय २८) असे आहे. आनंदा सर्जे हे सांगलीतील एका कापड दुकानात काम करत होते. त्याच दुकानात दीपक आजमाने हा तरुणही कामाला होता. याच दरम्यान दीपक आणि आनंदा यांच्या पत्नी पल्लवी सर्जे यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदा सर्जे यांना दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत ते पत्नीला वारंवार मारहाण करत तसेच मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर पल्लवी सर्जे आणि तिचा प्रियकर दीपक आजमाने यांनी मिळून आनंदा यांचा काटा काढण्याचा कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनेच्या दिवशी आनंदा सर्जे यांचा झोपेतच मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले. कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनाही सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू वाटला. मात्र मृत्यूबाबत काही बाबी संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. चौकशीदरम्यान आरोपींच्या जबाबांमध्ये वेगवेगळेपणा आढळून आला. त्यानंतर अधिक तपास आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आनंदा यांचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आले.
तपासात पल्लवी आणि दीपक यांनी मिळून हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली. या घटनेमुळे सांगली शहरात मोठी खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विश्रामबाग पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून खुनाच्या कटामागील इतर बाबींचाही शोध घेत आहेत. आरोपींविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.