

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईन लीक झाल्याने वाहतूक बंद
छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावरील गॅस गळतीची मोठी घटना
समृद्धी महामार्गावर गॅस गळतीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा
छत्रपती संभाजीनगरमधील समृद्धी महामार्गावर मोठी घटना घडलीय. महामार्गजवळील गॅस पाईपलाईन लीक झाली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडालीय. गॅस गळतीमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सध्या बंद करण्यात आलीय.
दरम्यान लासूर हडस पिंपळगाव टोलनाक्यावरून वाहतूक वळवण्यात आलीय. समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ४५१.२ येथे गॅस पाईपलाईन लीक झाल्याची घटना घडलीय. या घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून, गॅस गळती थांबवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, गॅस गळतीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर, दि. २९(जिमाका)-समृद्धी महामार्ग लगत असणाऱ्या टाकळीवाडी ता. गंगापूर येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागली असून खबरदारीचा उपाय म्हणून समृद्धी महामार्गा वरील साखळी क्रमांक ४४७ ते ४७० दरम्यानची (३० किमी अंतर-हडस पिंपळ गाव ते माळीवाडा) वाहतूक धुळे सोलापूर महामार्गावरून वळविण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी कळविले आहे.
आज सायं. ५ वा. सुमारास टाकळी वाडी येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागली. या घटनेची प्रशासनाने तात्काळ दखल घेत, त्वरित उपाययोजना सुरु केल्या. घटनास्थळी तात्काळ गेल कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाचरण करण्यात आले. तसेच अग्निशमन यंत्रणा सज्ज करण्यात आली. वाहतूक वळवली तथापी, खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावरील साखळी क्रमांक ४४७ ते ४७० दरम्यान ३० किमी वरील वाहतूक धुळे सोलापूर महामार्गावरून वळवण्यात आली आहे.
मुंबई कडुन जाणारे वाहने हे हडस पिंपळगाव इंटरचेंज वरून उतरून धुळे सोलापूर महामार्गावर जातील व माळीवाडा येथून पुन्हा समृद्धी महामार्गावर येतील. नागपूर कडुन येणारी वाहने माळीवाडा इंटर चेंज वरून धुळे सोलापूर महामार्गावर येतील व हडस पिपंळगाव येथून पुन्हा समृद्धी महामार्गावर येतील. रहदारी धुळे सोलापूर महामार्ग वरून वळविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी सांगितले.
दरम्यान गेल कंपनी च्या तज्ञानी दोन्हीही बाजू कडील व्हॉलव्ह बंद केले असून पाईप लाईन मधील दाब कमी होत आहे. लवकरच रहदारी सुरळीत होईल यासाठी प्रशासन अथक प्रयत्न करीत असून जिल्हाधिकारी व पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत. अधिक माहिती साठी समृद्धी महामार्ग नियंत्रण कक्ष क्रमांक 1800 233 22 33 व 8181818155 वर संपर्क साधता येईल, असेही कळविण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.