

सोलापुरातील रिलस्टार रोहिणी पाराध्ये यांनी आत्महत्या केली
‘हॉटेल ग्रामपंचायत’च्या स्वयंपाकघरात गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली
रोहिणी आणि त्यांचे पती सोशल मीडियावर रील्समुळे लोकप्रिय होते
आत्महत्येमागील कारण अस्पष्ट असून पोलिसांकडून तपास सुरू आहे
विश्वभूषण लिमये, सोलापूर
Reelstar Rohini Paradhye Suicide in Hotel Kitchen सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे एका रिलस्टार महिलेच्या आत्महत्येने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रोहिणी निलेश पाराध्ये (वय २५) असे मृत महिलेचे नाव असून, तिने हॉटेलच्या स्वयंपाकघरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ब्रह्मपुरी येथील ‘हॉटेल ग्रामपंचायत’ या त्यांच्या स्वतःच्या व्यवसायाच्या स्वयंपाकघरात लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने रोहिणीने गळफास घेतला. ही घटना उघडकीस आल्यानंतर तिचे पती निलेश पाराध्ये यांनी तात्काळ तिला मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. या घटनेची नोंद मंगळवेढा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पती निलेश पाराध्ये यांनीच याबाबत फिर्याद दिली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
रोहिणी आणि निलेश पाराध्ये हे दाम्पत्य मागील काही वर्षांपासून सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून लोकप्रिय झाले होते. विविध सामाजिक विषय, तसेच खाद्यपदार्थांवर आधारित व्हिडिओ तयार करून त्यांनी मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता. त्यांनी रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत ब्रह्मपुरी येथे ‘हॉटेल ग्रामपंचायत’ हा व्यवसाय सुरू केला होता. अल्पावधीतच या हॉटेलला चांगला प्रतिसाद मिळू लागला होता.
व्यवसायात स्थिर होत असतानाच आणखी नवीन शाखा सुरू करण्याचे नियोजन सुरू होते. अशा वेळी रोहिणीने अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तिच्या आत्महत्येमागील कारण काय, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. मात्र मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावरही शोककळा पसरली असून, तिच्या चाहत्यांकडून दुःख व्यक्त केले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.