रत्नागिरी जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटना घडल्या
आंबा घाटात एसटी-कार धडकेत पाच जण जखमी
दापोलीत दुचाकी-इको अपघातात तरुणाचा मृत्यू
अमोल कलये, रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या भीषण अपघातांच्या घटनांनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटात एसटी बस आणि एर्टिका कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन पाच जण जखमी झाले, तर दापोली तालुक्यातील देवाचा खळगा परिसरात झालेल्या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील दक्खन बस थांब्याजवळ हा अपघात घडला. भडकंबा येथील प्रल्हाद भिकाजी शिंदे हे आपल्या ताब्यातील एसटी बस खडीकोळवण ते साखरपा या मार्गावर घेऊन जात होते. याचवेळी समोरून येणाऱ्या कारची बसला जोरदार धडक बसली. या अपघातात एसटी चालक प्रल्हाद शिंदे हे जखमी झाले. तसेच बसमधील प्रवासी संजय तुकाराम शितप आणि एर्टिका कारमधील संतोष शिवाजी पवार, शंभुराज शिवाजी पवार आणि श्रीकांत लक्ष्मण मानपुरी हे देखील जखमी झाले. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
दरम्यान, दापोली-साखळोली मार्गावरील देवाचा खळगा परिसरात आणखी एक गंभीर अपघात घडला. या ठिकाणी असलेल्या धोकादायक वळणावर इको वाहन आणि दुचाकी यांच्यात भीषण धडक झाली. फणसू येथील शुभम फडकले आणि त्याचा मित्र अमन खांबे हे दुचाकीवरून प्रवास करत असताना समोरून येणाऱ्या इको वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात शुभम गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी तत्काळ मदत करत त्याला उपचारासाठी हलवले. पुढील उपचारासाठी त्याला मुंबई येथे नेण्यात येत होते, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे फणसू परिसरात शोककळा पसरली असून तरुणाच्या अकाली मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तसेच देवाचा खळगा परिसरातील धोकादायक वळणावर वारंवार अपघात होत असल्याने येथे तातडीने सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.