
Devendra Fadnavis- Raj Thackeray Meet : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये मुंबईतील ताज हॉटेलमध्ये भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभरापासून चर्चा सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही भेट महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युतीची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे आज फडणवीस यांनी मनसे अध्यक्षांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यातील भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याबाबत राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
ठाकरे बंधू एकत्र येणार ही चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली. मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे महाराष्ट्रात वेगळं समीकरण तयार होणार का? अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. मागील तासभरापासून राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दैनंदिन कार्यक्रमात राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा कोणताही उल्लेख नव्हता. दोन्ही नेत्यांमध्ये अचानक वांद्रे येथील ताज हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीत कशावर आणि काय चर्चा झाली? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण या भेटीवर सत्ताधारी आणि विरोधीपक्षाच्या नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
'कुणीही कुणालाही भेटू शकतो..या भेटीत वावगं काय आहे..काहीही झाले तरीही राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतीलच..'
अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते
राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील असं वातावरण निर्माण झालेले असताना राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. 'राज ठाकरे - उद्धव ठाकरे एकत्र येतील, असं वातावरण निर्माण झालं होतं तेव्हा, सर्वसामान्य माणसाच्या मनातसुद्धा आत्मीयतेची भावना निर्माण झाली होती. मात्र, अशा भावनिक क्षणी राज ठाकरे यांची फडणवीसांसोबतची भेट उघड होताच, एक नैसर्गिक प्रश्न उभा राहतो, या वातावरणाचा उपयोग करून मनसेने भाजपसोबत वाटाघाटी केली का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडेल, असे रोहित पवार म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.