

महाराष्ट्रासह १६ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
काही भागांत ताशी ७० ते ८० किमी वेगाने वादळी वारे वाहू शकतात
ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता
नागरिकांना सतर्क राहण्याचे हवामान खात्याकडून आवाहन
देशात मान्सून दाखल होऊन बरेच दिवस झाले तरी देखील अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नाही. काही राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे तर काही राज्यातील नागरिक अद्यापही पावसाची वाट पाहत आहेत. अशामध्येच भारतीय हवामान खात्याने या आठवड्यात १६ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतातील सर्व ८ राज्ये, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पावसाचा कहर पाहायला मिळेल. या राज्यांमध्ये पावसादरम्यान ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, तामिळनाडू, जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र, आसाम, कर्नाटक, झारखंड आणि पश्चिम बंगालसाठी पुढचे १० तास महत्वाचे आहे. या राज्यांमध्ये आज पावसाचा इशारा कायम राहिल. या राज्यांमध्ये मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मान्सूनने २२ राज्यांमध्ये प्रवेश केला असून ९ राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. उत्तर प्रदेशात मान्सून ९ दिवस उशिरा आला असून तो १६ दिवसांपासून बिहारच्या सीमेवर अडकून पडला आहे. आज बिहारच्या सीमेवरून मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सून उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड आणि गुजरातमध्ये पुढे सरकेल.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २९ जून रोजी आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिक्कीम, गोवा, तेलंगणा आणि कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, झारखंड आणि ओडिशा येथेही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
३० जून रोजी छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा, केरळ, गोवा, तामिळनाडू, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा, पूर्व राजस्थान आणि तामिळनाडू यासह अनेक राज्यांमध्ये ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या पावसाच्या दरम्यान नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.