पुण्यातील चिखली परिसरातून एका २४ वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला थेट उत्तर प्रदेशात पळवून नेण्याचा कट पोलिसांनी अतिशय धाडसाने उधळून लावला आहे. समृद्धी महामार्गावर तब्बल ३ किलोमीटर थरारक पाठलाग करत बाभळेश्वर विभागाच्या महामार्ग पोलिसांनी आरोपींना चहूबाजूंनी घेरून बेड्या ठोकल्या. या कारवाईत एका तरुणीसह ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.तसेच तरुणाची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अलर्टनंतर महामार्गावर नाकाबंदी
आरशद सिद्दीकी (वय २४) असे सुटका करण्यात आलेल्या पीडित तरुणाचे नाव आहे. पुण्यातील चिखली परिसरातून आरोपींनी त्याचे अपहरण केले होते. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तत्काळ सर्व यंत्रणांना अलर्ट जारी केला. आरोपी अर्टिगा कारने समृद्धी महामार्गावरून उत्तर प्रदेशच्या दिशेने पसार होत असल्याची माहिती मिळताच, बाभळेश्वर विभागाच्या महामार्ग पोलिसांनी समृद्धी महामार्गावर कडक नाकाबंदी आणि तीव्र शोधमोहीम सुरू केली.
चॅनल क्रमांक ५२० जवळ कारला घेरले
नाकाबंदी दरम्यान चॅनल क्रमांक ५२३ जवळ संशयित अर्टिगा कार अत्यंत भरधाव वेगाने जाताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी कोणताही वेळ न गमावता तत्काळ कारचा पाठलाग सुरू केला. सुमारे ३ किलोमीटर अत्यंत थरारक पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी चॅनल क्रमांक ५२० जवळ आरोपींच्या कारला चहूबाजूंनी घेरून अडवले.
आरोपी कोपरगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन
पोलिसांनी तात्काळ कारची झडती घेऊन पीडित तरुण आरशद सिद्दीकी याला सुखरूप बाहेर काढले. या कारवाईत कारमध्ये असलेल्या एका तरुणीसह उत्तर प्रदेशातील मूळ रहिवासी असलेल्या ६ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. कारवाईनंतर पकडण्यात आलेले सर्व आरोपी, पीडित तरुण आणि गुन्ह्यात वापरलेली अर्टिगा कार पुढील कायदेशीर कारवाईसाठी कोपरगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास आणि आरोपींचा ताबा पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे सोपवण्यात येत आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला असून सर्वत्र कौतुक होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.