

पितृपक्ष सुरू होताच राज्यातील राजकीय पक्ष सावध भूमिकेत
पितृपक्षात पक्षीय स्तरावर कोणत्याही घडामोडी घडू देऊ नका
आपल्याला पदाधिकाऱ्यांना वरिष्ठांकडून सूचना
सुरज मसूरकर, साम प्रतिनिधी
पितृपक्षाला सुरुवात होताच राज्यातील राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेतल्याचं चित्र आहे. विशेषतः सत्ताधारी पक्षांकडून पक्षीय पातळीवरील मोठ्या राजकीय घडामोडी टाळण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. पितृपक्ष सनातन परंपरेनुसार पूर्वजांप्रती आदर, स्मरण आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समर्पित असतो.
'पितृपक्ष' रविवारपासून सुरू झाला. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या प्रतिपदेपासून 'श्राद्ध' आणि 'तर्पण' या विधींना सुरुवात झाली. या वर्षी पितृपक्षाचा मुख्य कालावधी २७ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर असा असून, १० ऑक्टोबर रोजी 'सर्वपित्री अमावस्ये'ने याची सांगता होईल.
धर्मग्रंथांनुसार, पितृपक्षात नवीन वस्तू किंवा कपडे खरेदी करण्यास सक्त मनाई असते. दागिने, नवीन वस्त्रे, वाहने, स्थावर मालमत्ता किंवा लोखंडी वस्तू यांसारख्या मोठ्या गोष्टींची खरेदी करणे या काळात अशुभ मानले जाते. याचप्रमाणे राजकीय पक्षांनी पितृपक्षाला शुभ कामे करण्यास स्थगिती दिलीय. या पंधरवाड्यात पक्षांनी विशेषत: सत्ताधाऱ्यांनी राजकीय कार्यक्रम आणि पक्ष प्रेवशाचे कार्यक्रम घेण्यास स्थगिती दिलीय.
पितृपक्षाच्या काळात पक्षप्रवेश, मोठे राजकीय कार्यक्रम तसेच महत्त्वाचे निर्णय घेण्याबाबत वरिष्ठ नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पितृपक्षात पक्षीय स्तरावर कोणतीही मोठी घडामोड होऊ देऊ नका, अशा स्वरूपाच्या सूचना दिल्याचं सांगितलं जात आहे.
विशेषतः सत्ताधारी पक्षांमध्ये या काळात अधिक सावध भूमिका घेतली जात असल्याचं दिसून येत आहे. नव्या नेत्यांचा पक्षप्रवेश, मोठ्या सभा किंवा कार्यक्रमांचं आयोजन आणि महत्त्वाच्या राजकीय निर्णयांची घोषणा यांसारख्या बाबी पितृपक्षानंतर करण्याकडे पक्षांचा कल असल्याचं चित्र आहे.
दरम्यान, पितृपक्षाच्या काळात कोणतेही मोठे राजकीय निर्णय किंवा कार्यक्रम न घेण्यामागे धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचा प्रभाव असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. त्यामुळे आगामी काळात पितृपक्ष संपल्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठ्या राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.