गोपाल मोटघरे, ,साम टीव्ही
पिंपरी-चिंचवड शहरात एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे. तब्बल ७० पेक्षा जास्त चोरीचे गुन्हे अंगावर असलेला आणि थेट पोलिसांवरच गोळीबार करून पळून जाणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड शहरा पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
शेखर संभाजी जाधव असे या अटक करण्यात आलेल्या २५ वर्षीय आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून पोलिसांनी एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अत्यंत फिल्मी आहे. १३ मे ला दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी शेखर जाधव आणि त्याच्या इतर ३ साथीदारांनी फायरिंग करून खुनाचा प्रयत्न केला होता, तेव्हापासून ते फरार होते. याप्रकरणी दिघी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.
यानंतर १६ मे २०२६ रोजी गुन्हे शाखेचे पथक या मुख्य आरोपीचा माग काढत रांजणगाव येथे पोहोचले. मात्र, पोलिसांना पाहताच आरोपी शेखर जाधव आणि मुस्तफा उर्फ भाईजान यांनी त्यांचा पाठलाग करणाऱ्या पोलीस पथकावरच थेट फायरिंग केले. या गोळीबारानंतर आरोपींनी उसाच्या शेताचा फायदा घेतला आणि तेथून पळ काढला. याप्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यातही त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांवर फायरिंग करून पळालेल्या या आरोपीला पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अखेर १४ जून २०२६ रोजी संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास आरोपी शेखर जाधव हा दिघीतील मोझे शाळेजवळील मोकळ्या मैदानात येणार असल्याची खात्रीशीर माहिती तांत्रिक तपासावरून पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत शेखर जाधव याला एक देसी पिस्टल आणि एक जिवंत काडतूसासह बेड्या ठोकल्या आहेत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.