परभणीत SIR प्रक्रियेत लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार
कुटुंबातील सदस्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी लाचेची मागणी
लाच स्वीकारताना BLO रामेश्वर विलास काळे यांना ACBने रंगेहाथ पकडले
परभणीत SIR प्रक्रियेलाच लाचेचा डाग लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुटुंबातील सदस्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी तब्बल अडीच हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असून, तडजोडीनंतर दोन हजार रुपये स्वीकारताना संबंधित BLOला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले.
रामेश्वर विलास काळे असे कारवाई करण्यात आलेल्या BLOचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने आपल्या कुटुंबातील काही सदस्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, संबंधित सदस्यांची नावे 2002 सालच्या मतदार यादीत नसल्याचे कारण सांगत रामेश्वर काळे यांनी तक्रारदाराकडे अडीच हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने याबाबत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची ACBकडून प्राथमिक पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्याकडून लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर ACBच्या पथकाने सापळा रचला. लाचेच्या रकमेबाबत तडजोड झाल्यानंतर दोन हजार रुपये देण्याचे ठरले होते.
ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून दोन हजार रुपये स्वीकारताच ACBच्या पथकाने रामेश्वर काळे यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईमुळे मतदार यादीसारख्या महत्त्वाच्या शासकीय प्रक्रियेत पैशांची मागणी होत असल्याच्या आरोपामुळे नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी परभणी शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ACBच्या कारवाईनंतर संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी काही बाबी समोर येतात का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.