भरत नागणे, साम टीव्ही
पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात विहिरीत चार मजूर अडकल्याची घटना घडली आहे. या मजुरांना वाचवण्यासाठी सकाळी अकरा वाजल्यापासून बचावकार्य सुरू आहे. प्रशासनाकडून मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच भाजपच्या काही नेत्यांनी सोशल मीडियावर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या पोस्ट केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार प्रशांत परिचारक, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष मस्के, माऊली हळणवर यांच्यासह काही भाजप पदाधिकाऱ्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून भावपूर्ण श्रद्धांजलीच्या पोस्ट व्हायरल झाल्या. विशेष म्हणजे, त्यावेळी घटनास्थळी बचावकार्य सुरू होते आणि मजुरांना जिवंत बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते.
दरम्यान, ही चूक लक्षात आल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोशल मीडियावरील श्रद्धांजलीची पोस्ट डिलीट केली. मात्र, बचावकार्य पूर्ण होण्यापूर्वीच अशा प्रकारच्या श्रद्धांजलीच्या पोस्ट करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकीकडे जिल्हाधिकारी मजुरांना जिवंत वाचवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती देत असताना दुसरीकडे लोकप्रतिनिधींकडून मृत्यू झाल्याचे गृहीत धरून श्रद्धांजलीच्या पोस्ट केल्या जात असल्याने या प्रकारावर प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, बचावकार्य सुरू असून चारही मजुरांच्या प्रकृतीबाबत आणि पुढील परिस्थितीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.